सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.२ धुळे यांच्या अंतर्गत असलेल्या कामांची चौकशी वेगात; अनियमिततेवर प्रशासनाची कठोर भूमिका धुळे प्रतिनिधी धुळे...
सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.२ धुळे यांच्या अंतर्गत असलेल्या कामांची चौकशी वेगात; अनियमिततेवर प्रशासनाची कठोर भूमिका
धुळे प्रतिनिधी
धुळे : सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे अंतर्गत उपविभाग क्र. २ धुळे येथे २०२३ पासून आजपर्यंत करण्यात आलेल्या सर्व कामांची दक्षता व गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. अधीक्षक अभियंत्यांनी काढलेल्या या आदेशामुळे संबंधित विभागात मोठी हालचाल सुरू झाली आहे.
प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून सुनावणी घेऊन आवश्यक ती माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्व कामांची तांत्रिक कागदपत्रे, अंदाजपत्रके, मोजमाप पुस्तके, देयके व प्रत्यक्ष कामांची स्थिती तपासून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात तक्रारदार पत्रकार तथा जळगाव जिल्हाध्यक्ष,ऑल इंडिया ब्लू टायगर सेना हेमकांत बळीराम गायकवाड यांनी वारंवार निवेदने, ई-मेल व स्मरणपत्राद्वारे २०२३ पासून झालेल्या कामांमध्ये अनियमिततेची शक्यता व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने अधिकृतरीत्या चौकशीचे आदेश दिल्याने प्रकरणाला वेग आला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारींतील मुद्द्यांवर नियमानुसार कार्यवाही करून सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करावा तसेच त्याची माहिती तक्रारदारांना कळवावी,असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न दिसून येत असून, चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईबाबत उत्सुकता वाढली आहे.

No comments