माणुसकीचं जिवंत दर्शन : भारडू येथे माकडाची विधीवत अंत्ययात्रा, गावकऱ्यांनी दिला अखेरचा निरोप शामसुंदर सोनवणे चोपडा वि. प्र. (संपादक -:- हे...
माणुसकीचं जिवंत दर्शन : भारडू येथे माकडाची विधीवत अंत्ययात्रा, गावकऱ्यांनी दिला अखेरचा निरोप
शामसुंदर सोनवणे चोपडा वि. प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील भारडू गावात माणुसकीचं हृदयस्पर्शी आणि दुर्मीळ दर्शन घडले. गेल्या तीन वर्षांपासून भारडू गावात वास्तव्यास असलेल्या एका माकडाचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मानाने अखेरचा निरोप दिला. सदर माकड गेली तीन वर्षे गावात मुक्तपणे वावरत होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी त्याची एक आपुलकी निर्माण झाली होती. गावातील दैनंदिन जीवनाचा तो जणू अविभाज्य घटक बनला होता. त्यामुळे त्याच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. दि. ३ फेब्रुवारी २०२६, मंगळवार रोजी संध्याकाळी ८ वाजता भारडू गावात त्या माकडाची विधीवत अंत्ययात्रा काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने दफन विधी करण्यात आला. अंत्यसंस्काराच्या वेळी गावकरी व गावातील वातावरण भावूक झाले होते. याचबरोबर त्या माकडाचा दशक्रिया विधी तसेच उत्तरकार्य दहा दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. एका प्राण्याप्रती दाखवलेली ही संवेदनशीलता आजच्या समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. ही घटना केवळ एका माकडाच्या मृत्यूची नसून, माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं किती जिव्हाळ्याचं असू शकतं याचं सुंदर उदाहरण ठरली आहे. भारडू गावाने दाखवलेली ही माणुसकी परिसरात चर्चेचा विषय ठरत असून समाजाला सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.

No comments