न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र; प्रजासत्ताक दिनी भुसावळ नगर परिषद परिसरात प्रशासनाविरोधात घोषणाबाजी भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकां...
न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र; प्रजासत्ताक दिनी भुसावळ नगर परिषद परिसरात प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ नगर परिषद प्रशासनाकडून न्याय मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने प्रजासत्ताक दिनी गंभीर वळण घेतले. यापूर्वी १४ ऑगस्ट २०२५ तसेच २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जी.एस. ग्राउंडवर उपोषण करूनही मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त भुसावळ नगर परिषद कार्यालयात आयोजित झेंडावंदन कार्यक्रमानंतर स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेचे गांभीर्य ओळखत भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत श्री. सोनवणे यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर काही काळ नगर परिषद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संबंधितांकडून देण्यात आला आहे.


No comments