लातूरच्या शांततेवर घाला : भरचौकात तरुणाची हत्या, वाढत्या गुन्हेगारीवर आमदार अमित देशमुखांचा संताप "सुसंस्कृत शहरात गुंडागर्दी खपवून घे...
लातूरच्या शांततेवर घाला : भरचौकात तरुणाची हत्या, वाढत्या गुन्हेगारीवर आमदार अमित देशमुखांचा संताप
"सुसंस्कृत शहरात गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही" – अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर शहरातील शांततेला हादरा देणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या चाकू हल्ल्यात प्रज्वल संजय मस्के या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी रात्री निवडणूक प्रचार आटोपून बाभळगावकडे जात असताना आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या समोरच हा थरार घडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली गाडी थांबवली. आमदारांना पाहताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रज्वल मस्के याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था स्वतः आमदार देशमुख यांनी केली. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांशी संपर्क साधून सर्वोत्तम उपचाराच्या सूचना दिल्या. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान प्रज्वलचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आमदार अमित देशमुख यांनी वाढत्या गुन्हेगारीवर तीव्र संताप व्यक्त करत पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. "गुन्हेगारांना ठेचल्याशिवाय शांत बसणार नाही. आरोपींना तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे," असा इशाराही त्यांनी दिला. तसेच शहरातील अवैध धंदे आणि गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी ठोस कारवाईची मागणी करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरात पोलीस गस्त वाढवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. "लातूरसारख्या सुसंस्कृत शहरात भरचौकात हत्या होणे हे प्रशासनाचे अपयश आहे," अशा तीव्र शब्दांत त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला.

No comments