एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे भूमी अभिलेख कार्यालयाचा अजब कारभार; मोजणीवरून शेतकऱ्यांमध्ये संताप जळगाव जिल्हा प्रतिनिधी – समाधान पाटील (...
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे भूमी अभिलेख कार्यालयाचा अजब कारभार; मोजणीवरून शेतकऱ्यांमध्ये संताप
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे भूमी अभिलेख कार्यालयाच्या कथित मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शासकीय यंत्रणेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
कासोदा येथील गट क्रमांक ३२ मधील शेतकऱ्यांनी अधिकृत सरकारी फी भरून शेतजमिनीची मोजणी करून घेतली होती. मात्र, शेजारील गट क्रमांक ३३ मधील शेतकऱ्यांनी मोजणीदरम्यान गट क्रमांक ३२ ला खुणा गाडण्यास विरोध केला. गट क्रमांक ३२ च्या शेतकऱ्यांनी समजूत काढून वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर गट क्रमांक ३३ कडून स्वतंत्र मोजणी करण्यात आली.
मात्र, या मोजणीदरम्यान मोजणी अधिकारी राहुल पाटील यांनी पुन्हा गट क्रमांक ३२ व ३३ ची मोजणी दाखवून गट क्रमांक ३३ चे क्षेत्र गट क्रमांक ३२ कडे सरकवून दाखवले, असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याच कार्यालयातील मोजणी कर्मचारी योगेश शिवदास ठाकूर यांनी गट क्रमांक ३२ ची मोजणी केली असता दोन्ही मोजणीत मोठी तफावत आढळून आली. त्यामुळे “एकाच जमिनीची दोन वेगवेगळी मोजणी कशी काय?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, गट क्रमांक ३२ ची मोजणी आधीच पूर्ण झालेली असताना राहुल पाटील यांना पुन्हा मोजणी करण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी गट क्रमांक ३३ च्या शेतमालकांशी संगनमत करून पुन्हा मोजणी केल्याचा आरोप आहे. शेताच्या आजूबाजूला नाला असल्याचा गैरफायदा घेत, मोजणी करून क्षेत्र सरकवण्यात आल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आणखी गंभीर बाब म्हणजे, या मोजणीदरम्यान आधुनिक मोजणी यंत्रांचा वापर न करता केवळ टेपच्या सहाय्याने मोजणी करण्यात आली, हे अत्यंत संशयास्पद असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. “मशीनऐवजी टेपनेच मोजणी का केली? यामागे काही वैयक्तिक फायदा तर नाही ना?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे कासोदा गावात तीव्र चर्चा सुरू असून, भूमी अभिलेख कार्यालयावरचा शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून कारवाई होणार का, की त्यांना अभय दिले जात आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, गट क्रमांक ३२ च्या शेतमालकाला न्याय मिळेल का? तसेच शासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.



No comments