रमजान विशेष इस्लाममधील पाच श्रद्धा इस्लाम मध्ये पाच श्रद्धांना फार महत्व आहे प्रत्येक बांधव यावर विश्वास ठेवत जीवन जगतो जो तो आपल्याकडून ...
रमजान विशेष
इस्लाममधील पाच श्रद्धा
इस्लाम मध्ये पाच श्रद्धांना फार महत्व आहे प्रत्येक बांधव यावर विश्वास ठेवत जीवन जगतो जो तो आपल्याकडून सत्कर्म कसे घडेल यावर भर देत दुराचारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो.
१) एक अल्लाह : तो सर्वशक्तिमान असून एक आहे.जमिनीपासून आकाशापर्यंत त्याचेच राज्य आहे. सूर्य,चंद्र त्याचेच आज्ञाधारक आहे.आनंद,सुख,समाधान,चांगल्या गोष्टी तोच देतो."ला इलाह इल्लल्लाह" म्हणजे अल्लाहशिवाय कुणी दुसरा पूजेस पात्र नाही.या श्रद्धेलाच "तौहीद" म्हणतात.
२) देवदूत : अल्लाहने पृथ्वी व आकाशातील कार्य वेळेवर व व्यवस्थित व्हावीत यासाठी देवदूत अर्थात फरिश्ते निर्माण केले. ते रात्रंदिवस अल्लाचे हुकुम पाळण्यात मग्न असतात. पण आपल्याला दिसत नाहीत. हा इस्लामच्या श्रद्धेच्या दुसरा भाग आहे.
३) रसूल (प्रेषित) : अल्लाहचे जे रसूल (पैगंबर) आलेत ते सर्व खरे होते अल्लाहने त्यांना सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी पाठवले होते.
४) धर्मग्रंथ : रसुलांच्या मार्फत इन्जिल, जुबुर आणि कुराण हे ग्रंथ ज्ञानाच्या प्रकाश दाखवण्यासाठी आले. ते सर्व जीवन मार्गदर्शक आहेत.
५) मरणानंतर जिवंत होणे : मरणानंतर कयामत अंतिम दिवशी आपण सर्व जिवंत होऊ व अल्लाह समोर उभे केले जाऊ तो आपल्याला कर्माप्रमाणे मोबदला (स्वर्ग/नरक) देईल.ही श्रद्धाच प्रत्येक बांधवाला सत्कार्यास प्रेरित करते.
दान पुण्य कमविण्याच्या मार्ग
इस्लाम धर्माची तत्वे पाळणाऱ्या व्यक्तींनी आवश्यकतेपेक्षा अधिक आपल्याकडे जे सोने,चांदी,पैसा असेल त्याच्या चाळीसावा भाग रमजान महिन्यात दानधर्मात खर्च करावा. जनावरे शेती अधिक असणाऱ्यांनीही विशिष्ट दराने 'जकात' काढून गरिबांना मदत करावी. हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या हयातीत लोक जकातीचे पैसे धान्य हे 'नबीच्या मशिदीत' हजरत बिलाल किंवा जबाबदार व्यक्तीकडे आणून जमा करीत. नंतर गरजू लोकांना वाटण्यात येईल. हिजरी सण नऊमध्ये अरबस्तानात इस्लामी व्यवस्था स्थापन झाल्यावर 'जकात' वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. हे अधिकारी 'बैतूलमाल' या नावाने दिल्या जाणाऱ्या जकातीच्या पैसा वेळोवेळी गरिबांना देत व त्याच्या हिशेबही ठेवत म्हणून रमजान मध्ये दानधर्माला महत्त्व आहे हा महिना पुण्य कमविण्याच्या आहे जेवढे पुण्य कमविता येत असेल तितके कमवावे.
शब्दांकन -
अब्दुल सरदार पटेल (मुक्ताईनगर)
मो.८७६६७४७०९२

No comments