अहिल्यानगर महापौर-उपमहापौर पदावर भाजप–राष्ट्रवादी युतीचा शिक्कामोर्तब..! महापौरपदी ज्योती गाडे व उपमहापौरपदी धनंजय जाधव यांना उमेदवारीच्या ...
अहिल्यानगर महापौर-उपमहापौर पदावर भाजप–राष्ट्रवादी युतीचा शिक्कामोर्तब..! महापौरपदी ज्योती गाडे व उपमहापौरपदी धनंजय जाधव यांना उमेदवारीच्या सूचना
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- महापालिकेतील सत्तास्थापनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीत भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने महापौर व उपमहापौर पदासाठी आपल्या उमेदवारांवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे,तर उपमहापौर पदासाठी भाजपचे धनंजय जाधव यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
ही महत्त्वाची घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली.या बैठकीत युतीतील सर्व नगरसेवकांना एकसंघ राहण्याचे आवाहन करत महापालिकेतील आगामी कारभार स्थिर व विकासाभिमुख राहील,असा विश्वास नेतृत्वाने व्यक्त केला.महापौरपदासाठी उमेदवारी मिळालेल्या ज्योती गाडे या दिवंगत माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या कन्या असून,आमदार संग्राम जगताप यांच्या त्या मेहुणी आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि कुटुंबीयांचा राजकीय वारसा लक्षात घेता त्यांच्या उमेदवारीकडे विशेष महत्त्व दिले जात आहे.तर उपमहापौरपदासाठी निवड झालेल्या धनंजय जाधव हे तत्कालीन उपनगराध्यक्ष कृष्णा जाधव यांचे चिरंजीव असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. संघटनात्मक ताकद आणि पक्षातील विश्वासार्ह नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
भाजप–राष्ट्रवादी युतीने महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी स्पष्ट दिशा दिल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.या युतीमुळे महापालिकेत स्थिर प्रशासन,विकासकामांना गती आणि समन्वयातून कारभार होईल,असा दावा युतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. आगामी निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा न येता उमेदवारी अर्ज दाखल करून बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन करण्याचा आत्मविश्वास युतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. अहिल्यानगरच्या राजकारणात ही घडामोड निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

No comments