adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री संत नगरी शेगाव येथे गजानन महाराजांचा १४८ वा प्रगट दिन भक्तिभावात; मंदिर सलग २४ तास दर्शनासाठी खुले

 श्री संत नगरी शेगाव येथे गजानन महाराजांचा १४८ वा प्रगट दिन भक्तिभावात; मंदिर सलग २४ तास दर्शनासाठी खुले  पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हे...

 श्री संत नगरी शेगाव येथे गजानन महाराजांचा १४८ वा प्रगट दिन भक्तिभावात; मंदिर सलग २४ तास दर्शनासाठी खुले 


पल्लवी पाटील खामगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेगाव:- श्री संत गजानन महाराज माऊली यांचा १४८ वा प्रगट दिन येत्या ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावात साजरा केला जाणार असून, या पार्श्वभूमीवर श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या वतीने भाविकांसाठी ७ व ८ फेब्रुवारी रोजी मंदिर सलग २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थानचे प्रमुख पुजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रगट दिनानिमित्त राज्यासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक शेगाव नगरीत दाखल होत असून, सर्व भाविकांना सुलभ व सुरक्षित दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मंदिर अखंड दर्शनासाठी खुले राहणार आहे.

प्रगट दिनानिमित्त श्री गजानन महाराज संस्थानने भाविकांसाठी दर्शन, निवास व महाप्रसादाची चोख व्यवस्था केली असून, आरोग्य सुविधा व सुरक्षा व्यवस्था देखील सज्ज ठेवण्यात आली आहे. दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. भरत बुवा पाटील यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून, त्यानंतर श्री महारुद्र स्वाहाकार तसेच इतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. दरम्यान, या पावन सोहळ्यानिमित्त राज्याच्या विविध भागांतून शेकडो भजनी दिंड्या शेगावमध्ये दाखल होत असून, संपूर्ण शेगाव नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे.

या निमित्ताने श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, दर्शनासाठी येताना स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी तसेच मंदिरातील सर्व नियम व शिस्तीचे पालन करावे.

॥ श्री गजानन महाराज की जय ॥

No comments