स्वच्छता व दिवाबत्ती तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू; चोपडा नगरपरिषदेच्या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान चोपडा प्रतिनिधी (संपादक...
स्वच्छता व दिवाबत्ती तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू; चोपडा नगरपरिषदेच्या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा– शहरातील स्वच्छता व दिवाबत्ती संदर्भातील तक्रारींचे तात्काळ व प्रभावी निवारण व्हावे यासाठी चोपडा नगरपरिषदेने अभिनव पाऊल उचलत स्वतंत्र व्हॉट्सअॅप तक्रार निवारण सेवा सुरू केली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदविणे सुलभ झाले असून तक्रारींवर २४ तासांच्या आत कार्यवाही केली जात असल्याने शहरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
चोपडा नगरपरिषद नागरिकांना विविध नागरी सुविधा तत्परतेने उपलब्ध करून देत असते. स्वच्छता व विद्युत (स्ट्रीट लाईट) विभागाशी संबंधित तक्रारी पूर्वी विविध माध्यमांतून प्राप्त होत होत्या; मात्र कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने तक्रार निवारणास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले होते. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या संकल्पनेतून स्वच्छता विभाग व विद्युत विभागासाठी स्वतंत्र भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असून तक्रारींसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांक निश्चित करण्यात आला आहे.
या माध्यमातून आतापर्यंत स्वच्छता विभागाकडे व्हॉट्सअॅपद्वारे ५२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३१ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत, तर २१ तक्रारी प्रलंबित आहेत. रजिस्टरद्वारे ५३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३४ निकाली व १९ प्रलंबित आहेत. विद्युत (दिवाबत्ती) विभागाकडे व्हॉट्सअॅपद्वारे ४९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत, तर ९ प्रलंबित आहेत. तसेच जनरल स्वरूपाच्या १९५ तक्रारींपैकी १६४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून ३१ तक्रारी प्रलंबित आहेत. बहुतांश तक्रारींवर २४ तासांच्या आत कार्यवाही केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी सांगितले की, “नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ व प्रभावी निराकरण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून या सेवेच्या माध्यमातून तक्रार निवारण प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक झाली आहे.”
या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. स्व. शरदचंद्रिका आक्का कॉलनीच्या वतीने सांगण्यात आले की, व्हॉट्सअॅपवर तक्रार केल्यानंतर २४ तासांच्या आत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी गटारींचा गाळ काढून परिसर स्वच्छ केला. या तत्पर सेवेबद्दल त्यांनी नगरपरिषदेचे आभार व्यक्त केले आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छता विभागाचा व्हॉट्सअॅप तक्रार क्रमांक ७८२१९८९५३३ उपलब्ध करून देण्यात आला असून इतर विभागांच्या तक्रारी देखील याच क्रमांकावर नोंदविता येणार आहेत. विद्युत (दिवाबत्ती) विभागासाठी ९५२९२९६९२१ हा तक्रार क्रमांक उपलब्ध आहे. प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन संबंधित विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांमार्फत तात्काळ पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहर स्वच्छ, सुरक्षित व प्रकाशमान ठेवण्यासाठी नागरिकांनी या सेवेचा योग्य वापर करावा, असे आवाहन चोपडा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments