adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात “आनंदी आणि सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली” व्याख्यान; डॉ. मिलिंद सरदार यांचे प्रभावी मार्गदर्शन

 चोपड्यात “आनंदी आणि सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली” व्याख्यान; डॉ. मिलिंद सरदार यांचे प्रभावी मार्गदर्शन  चोपडा : प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...

 चोपड्यात “आनंदी आणि सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली” व्याख्यान; डॉ. मिलिंद सरदार यांचे प्रभावी मार्गदर्शन 


चोपडा : प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आदर्श आणि सुदृढ जीवनासाठी अर्धपोटी राहणे, सात्विक आहार, जेवणाच्या ठराविक वेळा, सकारात्मक विचार, बोलण्यावर नियंत्रण, प्राणायाम आणि ध्यान या गोष्टी अत्यावश्यक आहेत. असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव हीच मानवी अनारोग्याची प्रमुख कारणे आहेत. “चव आवडली म्हणून अती खाणे आणि दुसऱ्यांच्या भावनांचा विचार न करता बोलणे, यामुळेच आपले नुकसान होते. आपली जीभच आपली नाती आणि शरीर दोन्ही खराब करते,” असे मिश्किल शैलीत प्रतिपादन माधवबाग कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मिलिंद सरदार (पुणे) यांनी केले. ते चोपडा येथे महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित प्रियजन स्मृती व्याख्यानमालेत ‘आनंदी आणि सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. येथील पंकज बाल संस्कार केंद्रच्या आवारात ही व्याख्यानमाला सुरू आहे.

डॉ. सरदार पुढे म्हणाले की, सद्यस्थितीत भारतात सुमारे ५६ टक्के लोक हृदयरोगाच्या समस्यांनी ग्रस्त आहेत, तर परदेशात हे प्रमाण २६ टक्के आहे. अतीत्रास झाल्यानंतरच डॉक्टरांकडे जाण्याची मानसिकता आणि प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष ही यामागची कारणे आहेत. “सगळे आजार आपणच आपल्या घरात निर्माण करतो आणि ते दूर करण्याची ताकदही आपल्यातच आहे,” असे ते म्हणाले. दररोजच्या आहारात पालेभाज्या, फळभाज्या व कोशिंबिरींचा समावेश करणे, रात्री ७ नंतर जेवण टाळणे, भूक असेल तेवढेच आणि भूक लागेल तेव्हाच खाणे, दररोज किमान ३ किलोमीटर चालणे व नियमित व्यायाम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित प्राणायाम व ध्यान यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकून राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जीवन जगताना माफी मागणे आणि माफ करणे ही भूमिका ठेवावी. अहंकार सोडून इतरांच्या चांगल्या कामाचे कौतुक करावे, जगावर प्रेम करावे आणि दररोज मनमुराद हसावे, असा सकारात्मक संदेश त्यांनी दिला. व्याख्यानादरम्यान “कधीपासून सुरुवात करणार?” हा प्रश्न वारंवार उपस्थित करून त्यांनी श्रोत्यांना अंतर्मुख केले. या प्रसंगी मंचावर प्रायोजक डॉ. विकास हरताळकर, कुसुम पाटील, भूपेंद्र पाटील यांच्यासह पंकज समूहाचे डॉ. सुरेश बोरोले, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, शाखाध्यक्ष अशोक सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र महाजन व कार्याध्यक्ष विलास पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संदीप पाटील यांनी, वक्त्यांचा परिचय प्रभाकर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन धनश्री सनेर यांनी केले. यावेळी प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

No comments