महाशिवरात्री निमित्त लासुर येथे शिवपार्वती विवाहसोहळा थाटात संपन्न श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिर येथे भाविकांचा जनसागर उसळला विश्राम तेले चौग...
महाशिवरात्री निमित्त लासुर येथे शिवपार्वती विवाहसोहळा थाटात संपन्न
श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिर येथे भाविकांचा जनसागर उसळला
विश्राम तेले चौगाव/ लासुर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील लासुर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त लासुर गावात शिवशंकर भगवान आणि पार्वतीमातेचा विवाहसोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मंदिरात आलेल्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून साबुदाणा, दूध व केळ्याचा प्रसाद देण्यात आला. गावातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येत श्री नाटेश्वर भगवंताचे दर्शन घेतले व पूजा-अर्चा केली.
संध्याकाळी लासुर गावातून हजारोंच्या संख्येने जनसमुदायाच्या उपस्थितीत शिवशंकर महादेव व पार्वतीमातेच्या स्वयंवर व विवाहाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. नंदी महाराज, श्रीराम-लक्ष्मण, महाबली हनुमान व वानरसेना यांच्या साक्षीने वाजतगाजत, ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. “हर हर महादेव”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यानंतर श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिरात विधिवत मंत्रोच्चारात शिवशंभो व पार्वतीमातेचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यात गावासह परिसरातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. महाशिवरात्रीच्या या पवित्र महोत्सवानिमित्त उपस्थित भाविकांनी श्री नाटेश्वर भगवंताच्या चरणी प्रार्थना करून लासुर गाव व परिसरावर कोणतेही संकट ये ऊ नये, गाव प्रकोपापासून सुरक्षित राहो, अशी सामूहिक प्रार्थना केली.

No comments