मानवधर्माचे संशोधक, स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगे महाराज संपूर्ण भारत या राष्ट्रांमध्ये एकमेव महाराष्ट्र आहे की बाराव्या शतकापासून ...
मानवधर्माचे संशोधक, स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगे महाराज
संपूर्ण भारत या राष्ट्रांमध्ये एकमेव महाराष्ट्र आहे की बाराव्या शतकापासून किंबहुना त्यापूर्वी देखील या राज्यात संत साहित्याची, वारकरी संप्रदायाची, समतेची, न्यायाची, बंधूतेची, भक्तीची शिकवण येथील सर्व जनमानसामध्ये रुजत आली आहे. भक्त आणि भगवंत यांच्यामधील दुवा हा संत असतो. संतांनी दिलेली शिकवण व परमेश्वराची ओळख ही लोकांच्या मनामनामध्ये चिरकाल टिकते.महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक महान कृतीवीर, कर्मवीर, स्वच्छतेचे प्रणेते, माणसात देव शोधणारे संत म्हणजे गाडगे बाबा,
नाचू कीर्तनाचे रंगी |
ज्ञानदीप लावू जगी|
संत नामदेव महाराजांच्या विचारांचा वसा व वारसा चालवणारे महान संत गाडगे महाराज आहेत.संत नामदेव, संत कबीर, संत तुकाराम आदी संतांच्या लोकोध्दाराचा विचार आपल्या आयुष्यात प्रथम जगला व "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" या तुकोबांच्या शब्दांची कृती वर्तनातून जगून जगाला सांगितली. महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ ला शेडगाव ता. अंजनगाव सुर्जी जि. अमरावती येथे परीट समाजात झाला. डेबूजी झिंगराजी जानोरकर पुढे आपल्या लोक कार्यामुळे कर्मयोगी गाडगे महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. 80 वर्षाच्या त्यांच्या आयुष्यात केवळ लोक चळवळीतून सर्व सामान्यांना प्रबोधन करून अज्ञानी बहुजन समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे महान शिवधनुष्यरुपी कार्य महाराजांनी केले. निरक्षर असले तरी महाराजांना संत साहित्य तोंडपाठ होते. आपल्या विचारांच्या प्रचारासाठी "जनताजनार्दन"मासिक काढले ते एक महान संस्थापक संपादक होते. पत्रकारीतेच्या इतिहासातही एक संपादक म्हणून महाराजांची दखल घेणे गरजेचे आहे. सतत परिश्रम प्रबोधने, कीर्तने यामुळे त्यांच्या प्रकृतीला आजाराने ग्रासले असताना देखील क्षणाचीही उसंत व विश्रांती नव्हती. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, एका गावातून दुसऱ्या गावात फिरत असायचे, आपली शरीर प्रकृती बिघडत असताना देखील औषधाचा माझ्यावर काय परिणाम होणार, महाराज म्हणतात" इतकी हयात गुजरली, मला औषध घ्यावे नाही वाटले, हवा कशाला तो आजार, माणसाने सारखे काम करीत राहावे, काळाची हाक आली तर ती प्रत्येकाला स्वीकारावीच लागते" या बोलण्यातून गाडगेबाबांचा वेदांत सर्वांना समजतो. म्हणून कृतीतून बोलणारे संत सर्वसामान्यच्या कल्याणासाठी झिजत राहिले.
कर्मयोगी, कीर्तनकार म्हणून बाबा कायम प्रबोधन करायचे कीर्तनासाठी हमखास व्यवस्थेची जागा हवी, भजनी साथीदार हवेत, दिव्या बत्त्याची रोषणाई हवी, असा कुठलाही कटाक्ष नव्हता. हातात दोन दगडाचे टाळ घेतले की जयघोष सुरु. दिवसभर गावातील साफसफाई आणि संध्याकाळी जनमानसाच्या मनातील स्वच्छता कीर्तनाच्या माध्यमातून करून, कीर्तन हे समाज प्रबोधनाचे साधन असून त्यातून प्रचंड विज्ञानवाद, प्रयत्नवाद, सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगितला.
बाबा जितके त्यागी आहेत, तितकेच संसारी आहेत.ते जितके मायाळू आहेत, तितकेच कठोर आहेत. जितके विश्वस्त तितकेच संग्राहक, ते निर्मोही आहेत आणि व्यवहारी, प्रापंचिक ही आहेत. वृत्तीने जितके सरळ तितकेच कोणाबरोबर कोठे,काय आणि किती बोलावे याची व्यवहारी समज असणारे थोर तत्वज्ञानी, परंपरेच्या ठराविक चाकोरी बाहेरचे नव्या विचारांचे तत्त्वज्ञान बहुजन समाजाच्या मनी उतरवणे असे फार मोठे अग्निदिव्य मोठमोठ्या धर्मपंथ, संस्थापकांनी देखील हात टेकले होते, बाबा मात्र आपले सत्यशोधक विचार बेडरपणाने, बेधडक लोकांच्या पुढे कीर्तनातून मांडत,साध्या सोप्या भाषेत जीवनाचं अस्सल तत्त्वज्ञान देव हा मानसातच आहे, भुकेल्याला अन्न व गरिबाला शिक्षण तसेच खर्च कमी करा, व्यसनांपासून दूर राहा, जातीभेद,धर्मभेद,पंथभेद पाळू नका,सगळेच एक आहोत. कमावलेला पैसा समाजासाठी खर्च करा
"जोडोनिया धन उत्तम व्यवहारे|उदास विचारे वेच करी || हेच बाबांनी लोकांना सांगितले. खरा मानव धर्म समजावून सांगताना देव माणसात शोधता आला पाहिजे, स्वच्छता जेथे तेथेच परमेश्वराचा निवास, स्वच्छता हीच सेवा असून अंधश्रद्धा, जादूटोणा, नवसासाठी पशुबळी यांना कडाडून विरोध केला. विवेक, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा प्रचार केला. गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारली धर्मशाळा, गोशाळा, अनाथालय सुरू केलेत. जातीभेद, अस्पृश्यता याविरुद्ध ठाम भूमिका घेऊन सर्वधर्म व सर्व जाती समान आहेत असे ठणकावून सांगितले. अशा थोर तत्वज्ञानी समाज सुधारक, निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा आदर्शवादी विचार येणाऱ्या भविष्यातील पिढ्यांना प्रेरणादायी राहील.
जे का रंजले गांजले| त्यासी म्हणे जो आपुले||१|| तोचि साधू ओळखावा| देव तेथेची जाणावा||२||
रविंद्र खराटे सर
तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ
मलकापूर


No comments