जिल्ह्यात केमिकलपासून बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..तिघे जेरबंद.. लाखोंचा मुद्देमाल जप्त सचि...
जिल्ह्यात केमिकलपासून बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..तिघे जेरबंद.. लाखोंचा मुद्देमाल जप्त
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर : जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या केमिकलपासून बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने मोठा भंडाफोड केला आहे. जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे दूध संकलन केंद्रावर संयुक्त छापा टाकत तब्बल ₹१७ लाख ३२ हजार ८१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रामदास नवनाथ उबाळे (रा. फक्राबाद, ता. जामखेड) हा आपल्या दूध संकलन केंद्रात केमिकलपासून बनावट दूध तयार करून ते संकलित दुधात मिसळत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी राजेश नामदेव बडे यांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला.
छाप्यात समीर कमरुद्दीन शेख (वय ३०, रा. उंबरे, ता. राहुरी), आफताब कलीम शेख (वय २८, रा. राहुरी) व रामदास नवनाथ उबाळे (वय ४६, रा. फक्राबाद, ता. जामखेड) हे तिघे आढळून आले. तपासादरम्यान ६ ड्रममध्ये एकूण ११९८ लिटर ‘Paraffin Oil’, ३०० किलो पांढरी पावडर तसेच ३२० लिटर तयार केलेले बनावट दूध जप्त करण्यात आले. चौकशीत आरोपींनी या केमिकलपासून सुमारे २४ हजार लिटर दूध तयार करता येऊ शकते, अशी कबुली दिली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हे दूध मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे स्पष्ट केले.
जप्त मुद्देमालात ११९८ लिटर पॅराफिन ऑइल (₹२,३९,६००), ३०० किलो पावडर (₹८१,०५६), ३२० लिटर बनावट दूध (₹१२,१६०) तसेच दोन पिकअप वाहने (₹१४,००,०००) यांचा समावेश असून एकूण जप्ती ₹१७,३२,८१६ इतकी आहे.
या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. ८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २७४, २७५, १२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६(१), २६(२)(i) सह शिक्षा कलम ५७, ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments