रावेर लोकसभा अंतर्गत रेल्वे प्रकल्पांमुळे बाधित शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची बैठक रावेर प्रतिनिधी (...
रावेर लोकसभा अंतर्गत रेल्वे प्रकल्पांमुळे बाधित शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची बैठक
रावेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत रेल्वे विभागामार्फत विविध विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये जामनेर–पाचोरा–बोदवड पर्यंतची वाढीव रेल्वे लाईन तसेच भुसावळ–खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या विकासकामांमुळे अनेक शेतकरी बाधित झाले असून, त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे तसेच रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान बाधित शेतकऱ्यांच्या समस्या सविस्तरपणे जाणून घेण्यात आल्या असून, त्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी विशेषतः बोदवड व भुसावळ तालुक्यांतील तसेच वरणगाव परिसरातील रेल्वे रुळालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींवर भर देण्यात आला. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) व रेल्वे अंडर ब्रिज (आरयूबी) उभारणी, पर्यायी रस्त्यांची सुविधा तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. रेल्वे विकास प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही व त्यांच्या दैनंदिन शेती कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासन व रेल्वे विभागाने समन्वयाने काम करावे, असेही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी स्पष्ट केले.



No comments