कर्तव्यावरून भिडले पोलिस; दोघांचे निलंबन पोलीस अधीक्षकांची तातडीची कारवाई, खात्यात खळबळ चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ग्रा...
कर्तव्यावरून भिडले पोलिस; दोघांचे निलंबन
पोलीस अधीक्षकांची तातडीची कारवाई, खात्यात खळबळ
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ग्रामीण पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वी घडलेल्या धक्कादायक घटनेत हेड कॉन्स्टेबल शशिकांत पारधी आणि राकेश पाटील यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. ड्युटी व अंतर्गत कारणांवरून सुरू झालेला वाद अचानक विकोपाला गेला आणि दोघांमध्ये मारहाण झाली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले होते. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्येच अशा प्रकारे मारहाण होणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात असून, यामुळे पोलीस खात्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “जनतेने न्यायासाठी जायचे तरी कोणाकडे?” असा सवालही नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेत संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी यास दुजोरा दिला. दरम्यान, या घटनेची राज्यभर चर्चा होत असून पोलीस दलातील शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा घटनांवर कठोर कारवाई करून शिस्त अबाधित ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

No comments