कडगावच्या लेकीचा कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय सन्मान; सामाजिक कार्याची जागतिक दखल वसई विरार प्रतिनिधी – मनीषा जाधव (संपादक -:- हेमकांत गायकवा...
कडगावच्या लेकीचा कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय सन्मान; सामाजिक कार्याची जागतिक दखल
वसई विरार प्रतिनिधी – मनीषा जाधव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कडगाव गावच्या सुपुत्री सौ. सुमन गजानन देसाई (कै. रंगराव निळकंठराव पाटील यांच्या कन्या) यांना नुकताच ‘आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे ६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या विशेष समारंभात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे कडगाव गावासह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा पुरस्कार DS राठोड फाउंडेशन आणि मार्शल योगा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने, इंडियन पोलीस मित्र भारत यांच्या वतीने तसेच सर्किट बेंच फाउंडेशन यांच्या सहकार्याने प्रदान करण्यात आला. मोजक्या व निवडक व्यक्तींनाच दिल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सन्मानासाठी सौ. सुमन देसाई यांची खास आमंत्रणावरून निवड होणे, हे त्यांच्या कार्याची मोठी दखल मानली जात आहे.
मुंबईतील दहिसर परिसरात कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत असताना, दिनदुबळे, गोरगरिब व पीडित नागरिकांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्या सातत्याने करीत आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदतीचा हात देत, त्यांना आधार व मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सध्या त्या अँटी करप्शन इंटेलिजन्स कमिटी, दिल्ली – महाराष्ट्र राज्य महिला सचिव; ग्राहक संरक्षण समिती – महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा; माहिती अधिकार महासंघ, ठाणे – जिल्हा प्रमुख; पोलीस मित्र अपराध नियंत्रण व आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संस्था – महाराष्ट्र महिला सचिव तसेच शिवसेना – मीरा-भाईंदर महिला शहर प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आहेत.
त्यांच्या सामाजिक, राष्ट्रीय व मानवतावादी कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली ही दखल म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरवच असून, कडगावच्या लेकीने जागतिक पातळीवर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments