अशोक सोनवणे यांच्या काव्यसंग्रहाला काव्य रसिक मंडळाचा पुरस्कार जाहीर चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा - महाराष्ट्र साहि...
अशोक सोनवणे यांच्या काव्यसंग्रहाला काव्य रसिक मंडळाचा पुरस्कार जाहीर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक, कवी अशोक नीलकंठ सोनवणे यांच्या 'परिस्थितीच्या दुसेरीखाली' या काव्यसंग्रहाला डोंबिवलीच्या काव्य रसिक मंडळाचा 'कै.अनिल साठ्ये स्मृती सर्वोत्कृष्ट काव्य संग्रह : २०२५ पुरस्कार' नुकताच जाहीर झाला आहे. काव्य रसिक मंडळाच्या हिरक महोत्सवी संमेलनाच्या अध्यक्षा अंजली कुलकर्णी यांच्या हस्ते १ मार्च रोजी डोंबिवली येथे त्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
अशोक सोनवणे हे येथील प्रताप विद्या मंदिराचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून आजपर्यंत त्यांचे काव्यसंग्रह, कथासंग्रह, बाल नाट्य व निबंधमाला प्रकाशित आहे. पुण्याच्या आर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'परिस्थितीच्या दुसेरीखाली' या काव्यसंग्रहात शेतीभाती, शेतकऱ्याच्या व्यथांसोबत गावखेड्याचे जगणे, स्त्रीचे सोशिक जगणे, दोन पिढ्यांमधील वैचारिक भावविश्वाचे अंतर, म्हातारपणात वाट्याला येणाऱ्या एकटेपणाचे दुःख आहे आणि भोवतालच्या निसर्गाचे तसेच समाजाचे चिंतनशील निरीक्षण मांडण्यात आले आहे. यापूर्वीही त्यांच्या अनेक साहित्यकृतींना राज्यस्तरावर गौरवण्यात आले आहे.

No comments