लक्ष्मी जिनिंग परिसरात अनोळखी इसमाचा खून; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन जळगाव (प्रतिनिधी) – (संपादक हेमकांत गायकवाड) जळगाव तालुका पोल...
लक्ष्मी जिनिंग परिसरात अनोळखी इसमाचा खून; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) –
(संपादक हेमकांत गायकवाड)
जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मी जिनिंग परिसरात एका अनोळखी इसमाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 7.00 ते 8.00 वाजेच्या दरम्यान जळगाव ते कानळदा रोडवरील आव्हाने शिवारातील लक्ष्मी जिनिंग येथे ही घटना घडली. अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाचा अनोळखी इसम गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्यास तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दि. 24 फेब्रुवारी रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात सीसीटीएनएस क्रमांक 37/2026 अन्वये भा.दं.वि. कलम 103(1), 189(2), 189(4), 191(2), 190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेत मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा खुर्द, ता. जि. जळगाव), अजय डोंगर कोळी (रा. धोरखेडा, ता. यावल), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय उर्फ बादल शशिकांत सोनवणे (दोन्ही रा. बामणोड, ता. यावल) तसेच अफताब आरिफ खाटीक (रा. कुभारवाडा, जळगाव) यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासानुसार, संबंधित आरोपींनी एकत्रितपणे लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून अनोळखी इसमास गंभीर दुखापत केली. डोक्यावर, हातापायांवर व शरीराच्या इतर भागांवर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत इसम अंदाजे 30 ते 35 वर्षे वयोगटातील असून त्याचे नाव, गाव अद्याप समजू शकलेले नाही. त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. संबंधित व्यक्तीबाबत माहिती असल्यास जळगाव तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि अनंत भटू अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments