CRIME | कोपरगाव तहसील कार्यालयात लाचखोरीचा पर्दाफाश; ७ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महसूल सहाय्यकावर एसीबीची धडक कारवाई सचिन मोकळं अहिल्यान...
CRIME | कोपरगाव तहसील कार्यालयात लाचखोरीचा पर्दाफाश; ७ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महसूल सहाय्यकावर एसीबीची धडक कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तहसील कार्यालयात लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून महसूल सहाय्यक महिलेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ कारवाई केली आहे. श्रीमती अंजना पंडित पवार (वय ३६ वर्षे), महसूल सहाय्यक, वर्ग–३, तहसील कार्यालय, कोपरगाव (ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) यांनी तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्रमांक /२०२६ दाखल करण्यात आला असून, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक/अहिल्यानगर यांच्यावतीने दि. ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आली.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव तहसील कार्यालयातील कामकाजासंदर्भात मा. न्यायालयाच्या आदेशानुसार मिळकतीचा वाटप तक्ता मंजूर करून ताबा देण्याचा आदेश तहसीलदारांकडून मिळवून देण्यासाठी महसूल सहाय्यक श्रीमती अंजना पंडित पवार यांनी ७ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान श्रीमती अंजना पंडित पवार यांनी स्वतःच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून तक्रारदाराकडून ७ हजार रुपये लाच स्वीकारल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले. ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली व पोलीस उपअधीक्षक श्री. अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. कारवाईत पोलीस अंमलदार गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, वैभव सुपेकर व हरून शेख सहभागी होते.

No comments