पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई; वाळू माफिया सुरज शिंदे MPDA अंतर्गत स्थानबद्ध! सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रति...
पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई; वाळू माफिया सुरज शिंदे MPDA अंतर्गत स्थानबद्ध!
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.
संपादक हेमकांत गायकवाड
पंढरपूर:- तालुक्यांतील सराईत वाळू तस्कर सुरज हरिभाऊ शिंदे (वय 26, रा. अनवली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यास महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून त्याला Yerwada Central Jail येथे रवाना करण्यात आले आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. सुरज शिंदे हा कोणताही वैध व्यवसाय न करता पंढरपूर तालुक्यातील आझेवाडी परिसर तसेच भीमा व माण नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून विक्री करत होता. या अवैध धंद्यातून मिळालेल्या पैशांच्या जोरावर परिसरात दहशत निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना दमदाटी केल्याच्या तक्रारी होत्या. त्याच्याविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे तसेच इतर पोलीस ठाण्यांमध्ये सरकारी कामात अडथळा, चोरी, वाळू तस्करी व दहशत निर्माण करणे अशा एकूण 11 गुन्ह्यांची नोंद आहे.
सदर आरोपीच्या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याच्यावर MPDA कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार आदेश प्राप्त झाल्यानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपीस ताब्यात घेऊन 27 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री येरवडा कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कठोर कारवाईमुळे पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू तस्करीस मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments