चोपड्यात राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई; होळीपूर्वी ७.८१ लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त चोपडा प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड) चोपडा (...
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चोपडा (जि. जळगाव) : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोपडा तालुक्यात मोठी कारवाई करत तब्बल सुमारे ७ लाख ८१ हजार रुपयांचा बनावट व बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला आहे. ही कारवाई ०२ मार्च २०२६ रोजी उपविभागीय पथकाने केली.
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चोपडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उनपदेव-वड्री रस्ता परिसरात सापळा रचून चारचाकी वाहनातून मद्य विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकला. छाप्यात विविध प्रकारच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या, बिअरचे बॉक्स तसेच विक्रीसाठी वापरले जाणारे वाहन जप्त करण्यात आले.
जप्त मुद्देमालाचा तपशील
कारवाईदरम्यान खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला –
५०० मि.ली. क्षमतेच्या बिअरच्या ३६६ बाटल्या
१८० मि.ली. क्षमतेच्या देशी दारू टाँगो पंचच्या २७३ बाटल्या
९० मि.ली. देशी दारू टाँगो पंचच्या २६२ बाटल्या
१८० मि.ली. रॉयल स्टॅगच्या २४ सीलबंद बाटल्या
महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक.एम पी.४६ झेडबी- ८४५४ नमूद)
दोन प्लास्टिक टब व इतर साहित्य
एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे ७,८१,०१० रुपये असल्याचे विभागाने नमूद केले आहे.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती विभागाने दिली.
नागरिकांना आवाहन
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास विभागाच्या अधिकृत दूरध्वनी क्र.१८००३३९९९९,८४२२००११३३कळविण्याचे आवाहन केले आहे.
होळी सणादरम्यान अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी विभाग सतर्क असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

No comments