पत्रकार अशोक जसवाणी यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर सत्यनिष्ठा, समाजाभिमुख वृत्तांकन आणि उत्कृष्ट कार्याची राज्यस्तरावर ...
पत्रकार अशोक जसवाणी यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
सत्यनिष्ठा, समाजाभिमुख वृत्तांकन आणि उत्कृष्ट कार्याची राज्यस्तरावर दखल
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव : पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्य केल्याबद्दल खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक जसवाणी यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाज प्रतिबिंब बहुउद्देशीय संस्था, बी.एस.एफ. बहुउद्देशीय संस्था, सत कबीर बहुउद्देशीय संस्था आणि उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सामाजिक, कृषी, क्रीडा, उद्योग, शैक्षणिक, प्रशासकीय, कला आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे ७० मान्यवरांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो. यावर्षी पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अशोक जसवाणी यांची निवड करण्यात आली आहे.
नाशिक येथे ३१ मे रोजी आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकारांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या पत्रकारितेतील सत्यनिष्ठा, समाजाभिमुख वृत्तांकन आणि उत्कृष्ट कार्याची दखल घेऊनच त्यांची निवड करण्यात आली आहे. खामगावसह बुलडाणा जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे अशोक जसवाणी गेल्या तब्बल ३५ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. मागील २२ वर्षांपासून ते ‘सांज दैनिक खबरे शामतक’ या वृत्तपत्राचे संपादक म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वीही खामगाव प्रेस क्लबचा कै. बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार, जिल्हास्तरीय महेश रत्न पुरस्कार तसेच राज्यस्तरीय नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पत्रकारिता पुरस्कार (मुंबई) अशा विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
पत्रकारितेसोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग असून ते विदर्भ सिंधी विकास परिषद, बुलडाणा जिल्ह्याचे उपाध्यक्ष तसेच श्री गुरुनानक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित करून स्वावलंबी बनवले आहे. त्यांची कन्या डॉ. जया जयेश खुबनानी (बीएएमएस, एमडी) वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून मोठा मुलगा नानक जसवाणी हा संगणक अभियंता म्हणून इन्फोसिस, पुणे येथे कार्यरत आहे. धाकटा मुलगा अमन जसवाणी (बी. फार्मसी) ‘न्यू महाराष्ट्र मेडिकल’चा संचालक आहे. पत्नी सौ. वर्षा जसवाणी या निवृत्त शिक्षिका आहेत. उच्चशिक्षित आणि सामाजिक भान जपणाऱ्या जसवाणी कुटुंबाची पत्रकारिता, वैद्यकीय, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील सेवा उल्लेखनीय असून त्यांचा हा सन्मान खामगावसह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

No comments