चोपडा येथे लैंगिक कामगार महिलांसाठी कायदेविषयक जनजागृती सत्र.. अमळनेर प्रतिनिधी : (संपादक :- हेमकांत गायकवाड) आधार बहुउद्देशीय संस्था, अम...
चोपडा येथे लैंगिक कामगार महिलांसाठी कायदेविषयक जनजागृती सत्र..
अमळनेर प्रतिनिधी :
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या वतीने चोपडा येथील रेड लाईट परिसरातील वार्ड क्र. ३४ व ३५ मधील लैंगिक सेवा देणाऱ्या महिलांसाठी “लैंगिक कामगारांचे अधिकार” या विषयावर विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्रात मे २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ऍडव्होकेट उमेश मराठे यांनी गुन्हेगारी प्रक्रिया, कायदेशीर संरक्षण तसेच पोलिसांची भूमिका याबाबत स्पष्ट माहिती दिली. तसेच महिलांनी स्वतःची सुरक्षितता कशी जपावी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर ऍडव्होकेट सुयेश ठाकूर यांनी लैंगिक कामगार महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, अडचणी आणि शासकीय यंत्रणांची भूमिका यावर प्रकाश टाकला. विधी सेवा समिती, चोपडा येथील संदीप एस. मराठे व संजय सोनवणे यांनीही विविध कायद्यांविषयी माहिती देत महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात आधार संस्थेचे दीपक संदानशिव यांनी महिलांच्या आरोग्य, विशेषतः मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करत त्यांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज अधोरेखित केली. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील व कार्यकारी संचालक रेणू प्रसाद यांनी महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक राहून आत्मविश्वासाने जीवन जगण्याचे आवाहन केले.
चर्चासत्रादरम्यान सीमा शेख यांनी “महिलांनी आपल्या समस्या स्वतः मांडून आत्मविश्वासाने पुढे यावे,” असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर बिरारी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश महाजन, यास्मिन शेख, वंदना पावरा, तौसिफ शेख, मोहिनी धनगर, लेनिन महाजन व दिपक विश्वेश्वर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सत्रामुळे महिलांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.


No comments