जळगाव जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीचे निवेदन; विविध मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधले जळगाव जिल्हा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ब...
जळगाव जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीचे निवेदन; विविध मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधले
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बहुजन समाज पार्टी, जळगाव जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच प्रांत अधिकाऱ्यांना विविध स्थानिक प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे शहरातील मूलभूत सुविधा, सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक स्मारकांच्या जतनासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, चोपडा नगर परिषद क्षेत्रातील अतिक्रमण धारकांना जमीन पट्टे देऊन त्यांचे घरकुल मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित नागरिकांना त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची अवस्था जीर्ण झाली असून, त्याठिकाणी नवीन व पूर्णाकृती पुतळे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, नागरिकांना त्रास देणाऱ्या तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व पुरेशा प्रमाणात करण्यावरही भर देण्यात आला आहे.
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याची तसेच महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या या निवेदनामुळे प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments