मलकापूरमध्ये झाडतोड प्रकरणावरून प्रहारचा इशारा; दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलन अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलक...
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : शहरातील पाणी पुरवठा विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील हिरवीगार झाडे कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आल्याचा प्रकार ८ मार्च रोजी उघडकीस आला होता. मात्र दोन दिवस उलटूनही नगर परिषद प्रशासनाकडून याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याने प्रशासन झाडतोड करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या गंभीर वृक्षतोड प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी १० मार्च रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मलकापूर नगर परिषद अंतर्गत असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात ८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास मोठी हिरवीगार झाडे कटर मशिनच्या सहाय्याने कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आली. या झाडांची कत्तल होत असल्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
एकीकडे शासन झाडे लावा व झाडे जगवा अभियानासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना नगर परिषदेच्या माध्यमातूनही दरवर्षी वृक्षारोपण मोहिमांवर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र त्याच नगर परिषद प्रशासनाच्या अखत्यारितील पाणी पुरवठा विभागाच्या परिसरातील मोठी झाडे सर्रासपणे तोडली गेली आणि दोन दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने या प्रकरणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, झाडतोड प्रकरणात कारवाई करण्याऐवजी परिसरातील शाळेच्या मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती समोर येत आहे. जर ही झाडे मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून तोडण्यात आली असतील, तर त्यांच्याविरोधात थेट तक्रार दाखल करणे अपेक्षित असताना केवळ नोटीस देऊन प्रशासन पळवाट काढत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकरणात झाडे तोडणाऱ्यांचा शोध घेऊन ती कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या कारणासाठी तोडण्यात आली याची सखोल चौकशी करावी व संबंधितांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून नगर परिषद प्रशासनाविरोधात प्रहार स्टाईलने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या शेवटी अजय टप यांनी दिला आहे.

No comments