माहिती अधिकार प्रकरणी हालचाल वेगात हेमकांत गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीची दखल महाराष्ट्र शासन च्या आदिवासी विकास विभागाकडून कार्यकारी अभ...
माहिती अधिकार प्रकरणी हालचाल वेगात हेमकांत गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीची दखल
महाराष्ट्र शासन च्या आदिवासी विकास विभागाकडून कार्यकारी अभियंत्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश
नाशिक प्रतिनिधी
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या दोन प्रथम अपील अर्जांवर अखेर विभागीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. अधीक्षक अभियंता, सा.बां. (आदिवासी) मंडळ, नाशिक यांनी दि. २ मार्च २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे संबंधित कार्यकारी अभियंत्यांना तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
रामपुरा कैकाडी वाडा, ता. चोपडा, जि. जळगाव येथील हेमकांत बळीराम गायकवाड यांनी दि. १२ डिसेंबर २०२५ व दि. ०५ जानेवारी २०२६ रोजी नाशिक विभागाकडे दोन स्वतंत्र प्रथम अपील अर्ज सादर केले होते. या दोन्ही अर्जांच्या प्रती मंडळ कार्यालयास ई-मेलद्वारे प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही करणे बंधनकारक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सदर प्रकरणात कार्यकारी अभियंता, सा.बां. (आदिवासी) विभाग, नाशिक यांना त्यांच्या स्तरावरून तात्काळ पुढील कार्यवाही करून केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मंडळ कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या आदेशाची प्रत अर्जदार श्री. गायकवाड यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आली असून, माहिती अधिकार प्रकरणात आता प्रशासनावर जबाबदारी निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
माहिती अधिकार कायदा हा नागरिकांना पारदर्शकतेचा अधिकार देणारा प्रभावी कायदा असून, संबंधित विभागाने वेळेत आणि नियमबद्ध पद्धतीने माहिती उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. या प्रकरणाकडे आता संबंधित नागरिक व स्थानिक पातळीवर लक्ष लागले आहे.

No comments