अमित देशमुख यांची विकासाभिमुख वाटचाल; आधुनिक नेतृत्वाचा लातूरला लाभ लातूर, जि. प्र. (उत्तम माने): (संपादक -:- हेमकांत गायकवाड) माजी मंत्री...
अमित देशमुख यांची विकासाभिमुख वाटचाल; आधुनिक नेतृत्वाचा लातूरला लाभ
लातूर, जि. प्र. (उत्तम माने):
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
माजी मंत्री व आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या कार्यशैलीतून राज्याच्या राजकारणात एक अभ्यासू, सुसंस्कृत आणि तंत्रस्नेही नेतृत्व म्हणून ठसा उमटवला आहे. आज (२१ मार्च) त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचा आढावा घेतला जात आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांचा ‘माणसं जोडण्याचा’ वारसा आणि अमित देशमुख यांची प्रशासकीय शिस्त, लोकसंपर्क व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड – हा लातूरच्या विकासाचा प्रमुख आधार ठरला आहे.
अमित देशमुख यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९९७ मध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून झाली. त्यानंतर त्यांनी केवळ लातूरपुरते मर्यादित न राहता कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून काम करत पक्ष संघटना मजबूत केली.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ या सलग चार निवडणुकांत त्यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. २०१२ च्या लातूर महानगरपालिका निवडणुकीत ७० पैकी ४९ जागांवर काँग्रेसला बहुमत मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-वंचित आघाडीने ४७ जागा जिंकून सत्ता स्थापन केली.
मंत्रीपदाच्या काळात त्यांनी विकासाची ठोस कामगिरी केली. २०१४ मध्ये राज्यमंत्री म्हणून पर्यटन व ऊर्जा विभागाची जबाबदारी सांभाळताना अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला चालना देत राज्यात ३९९ वारा परिमापन केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला.
२०१९ ते २०२२ या काळात वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून त्यांनी कोरोना संकटात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी मोठे योगदान दिले. राज्यात प्रयोगशाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवणे, ऑक्सिजन प्लांट उभारणे, व्हेंटिलेटर व बेडची सुविधा उपलब्ध करून देणे यासारखी महत्त्वाची कामे त्यांनी केली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णयही घेतला.
लातूरचे पालकमंत्री म्हणून अवघ्या १०० दिवसांत १००० कोटींचा निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देत त्यांनी विकासाला गती दिली. ‘विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’साठी अद्ययावत सुविधा मंजूर करून लातूरला ‘मेडिकल हब’ बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले.
सहकार क्षेत्रातही त्यांनी नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे. साखर उद्योगात यांत्रिकीकरण, सह-वीज निर्मिती व इथेनॉल प्रकल्प उभारणी यामुळे उद्योगाला नवी दिशा मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखालील प्रकल्पांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधण्यावरही त्यांनी भर दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी हेल्पलाईन व व्हॉट्सअॅप सुविधा सुरू केली आहे.
मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र विधानसभा काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी झालेली त्यांची निवड ही त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाची साक्ष आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांचा वारसा आणि अमित देशमुख यांची आधुनिक दृष्टी यांचा संगम लातूरला भविष्यात कृषी, सहकार, वैद्यकीय व औद्योगिक क्षेत्रात अग्रस्थानी नेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या हातून अशीच लोकसेवा घडो, हीच सर्वत्र शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

No comments