कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक उघड..! नगर तालुका पोलिसांची धडक कारवाई दोघांवर गुन्हा दाखल.. अहिल्यानगर (प्रतिनिधी) – (संपादक :- हेमका...
कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक उघड..! नगर तालुका पोलिसांची धडक कारवाई दोघांवर गुन्हा दाखल..
अहिल्यानगर (प्रतिनिधी) –
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांची अमानुष व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर नगर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी योगेश बाबासाहेब ताकपेरे (वय ३२ वर्षे, रा. हिंगणगाव ता.जि. अहिल्यानगर) व मुस्तसर कादिर कुरेशी (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट ता.जि. अहिल्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेबाबत विकांत विलास भालसिंग (वय २९ वर्षे, धंदा – नोकरी) यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
संशयास्पद गाडीवरून उघड झाला प्रकार
नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तातडीने पथक तयार करून संशयित वाहनावर लक्ष ठेवले.पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता एका वाहनातून जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एक गाय व एक बैल बांधून नेण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. जनावरांना योग्य सोयीसुविधा न देता त्यांना क्रूर पद्धतीने कोंबून वाहतूक केली जात असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहन ताब्यात घेतले.
३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईदरम्यान पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला एक गाय एक बैल
टाटा कंपनीची गाडी (क्र. MH-16-CD-4481)
या सर्वांची मिळून अंदाजे ३,३०,००० रुपयांची किंमत असून पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने (नगर ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, पोलीस अंमलदार शकील सय्यद आणि पोलीस अंमलदार विक्रांत भालसिंग यांनी सहभाग घेतला.या प्रकरणाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत..

No comments