फैजपूर नगरपरिषदेत नगरसेविका प्रियंका इंगळे यांचा संताप; लाईट व घाणीच्या प्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा फैजपूर ( इदू पिंजारी) (संपादक -:- हे...
फैजपूर नगरपरिषदेत नगरसेविका प्रियंका इंगळे यांचा संताप; लाईट व घाणीच्या प्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा
फैजपूर ( इदू पिंजारी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर नगरपरिषदेत आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका प्रियंकाताई ईश्वर इंगळे यांनी आपल्या प्रभागातील मूलभूत सुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला. वार्डातील स्ट्रीट लाईट बंद, तसेच अस्वच्छतेच्या गंभीर प्रश्नांवर त्यांनी संतप्त भूमिका मांडली. इंगळे यांनी सभागृहात सांगितले की, त्यांच्या वार्डातील अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट पूर्णपणे बंद असून याबाबत संबंधित कर्मचारी खिलचंद वाघुळदे तसेच ठेकेदारांना वारंवार कळवूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. उलट अधिकाऱ्यांकडून उर्मटपणे उत्तर दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यासोबतच गटारी साफ केल्यानंतर त्यातील घाण वेळेवर उचलली जात नसल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित ठेकेदार व कामगारांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदारांचे बिल तात्काळ थांबवून त्यांचा ठेका रद्द करण्यात यावा, तसेच जबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी इंगळे यांनी केली. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही केली नाही, तर फैजपूर नगरपरिषदेत आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

No comments