फैजपूर नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; नगरसेविका सुमैय्या शेख कुरबान यांचा हिशोब सादर करण्याचा ठाम आग्रह फैजपूर ( इदू पिंजारी) (संपा...
फैजपूर नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; नगरसेविका सुमैय्या शेख कुरबान यांचा हिशोब सादर करण्याचा ठाम आग्रह
फैजपूर ( इदू पिंजारी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर नगरपालिकेतील प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, याबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका सुमैय्या शेख कुरबान यांनी आज (दि. २४ मार्च २०२६) झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत मागील काही वर्षांतील सर्व कामांचा सविस्तर हिशोब सादर करण्याची जोरदार मागणी केली.
नगरपालिकेत प्रशासकीय राजवटीदरम्यान नेमकी कोणती विकासकामे झाली, किती निधी खर्च करण्यात आला आणि त्या कामांची सद्यस्थिती काय आहे, याबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप त्यांनी केला. “फक्त विकासाच्या घोषणा करण्यात आल्या की प्रत्यक्षात काही वेगळेच घडत होते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सदर निवेदनात अर्थसंकल्पातील खर्च, महसूल वसुली, कर्ज व्यवहार तसेच विकास आराखड्यात करण्यात आलेले बदल यांची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. यासोबतच कंत्राटदारांची निवड प्रक्रिया आणि मंजूर कामांची अंमलबजावणी याबाबतही स्पष्ट माहिती देण्याची मागणी करण्यात आली.
“लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना माहिती मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. हा हक्क मिळवण्यासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत,” असे सुमैय्या शेख कुरबान यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संबंधित हिशोब समोर आल्यास अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फैजपूर नगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आहे की काही बाबी दडवण्यात आल्या आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments