शिवराज सिंह चव्हाणांच्या अमळनेर दौऱ्यापूर्वी 'प्रहार' आक्रमक; केळी बाजारभाव आणि कर्जमाफीवरून संतोष पाटलांचा थेट सवाल विकास पाटील व...
शिवराज सिंह चव्हाणांच्या अमळनेर दौऱ्यापूर्वी 'प्रहार' आक्रमक; केळी बाजारभाव आणि कर्जमाफीवरून संतोष पाटलांचा थेट सवाल
विकास पाटील वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अमळनेर: केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री माननीय श्री. शिवराज सिंह चव्हाण साहेब यांचे अमळनेर नगरीत स्वागत होत आहे. मात्र, हे स्वागत केवळ औपचारिकता न राहता, त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अमळनेर तालुकाध्यक्ष संतोष पाटील यांनी केली आहे. "जर केंद्रीय मंत्र्यांना खरोखरच शेतकऱ्यांविषयी कळवळा असेल, तर त्यांनी केवळ भाषणाबाजी न करता शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जाहीर करावेत," असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जळगावचा केळी बाजारभाव जळगावातच ठरावा जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, मात्र या जिल्ह्याचा केळी बाजारभाव बोर्ड शेजारच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे ठरवला जातो. यावर आक्षेप घेत संतोष पाटील म्हणाले की, "जर शिवराज सिंह चव्हाण खरोखरच शेतकऱ्यांचे हित जोपासणारे असतील, तर जळगाव जिल्ह्याचा केळी बाजारभाव बोर्ड मध्य प्रदेशात न होता जळगाव जिल्ह्यातच निघावा. तरच आम्ही त्यांचे स्वागत मनापासून करू."
हमीभावाचा प्रश्न आणि केंद्रीय मंत्र्यांची जबाबदारी कपाशी, मका, केळी, तूर आणि सोयाबीन यांसारख्या मुख्य पिकांना शासनाने ठरवलेला हमीभाव प्रत्यक्षात मिळतोय का? असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाने उपस्थित केला आहे. जर हमीभाव दिला जात असेल, तर केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः महाराष्ट्रात येऊन त्याची घोषणा करावी किंवा राज्यातील कृषी मंत्र्यांना तसे कडक आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाळणूक थांबवा राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा केलेली असतानाही, जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. डीओ (DO) मार्फत सेक्रेटरींना पुढे करून गोरगरीब शेतकऱ्यांना १३ टक्के व्याज लागेल, अशी धमकी दिली जात आहे. या लुबाळणुकीवर केंद्रीय मंत्री म्हणून शिवराज सिंह चव्हाण न्यायनिवाडा करणार का? असा थेट प्रश्न विचारण्यात आला आहे. "जनतेच्या पैशावर फक्त मजा मारायला येताय की काय?" शिवराज सिंह चव्हाण यांच्या दौऱ्याच्या खर्चावर आणि फौजफाट्यावरही संतोष पाटील यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.
"सामान्य जनतेने टॅक्सच्या रूपाने दिलेल्या पैशावर मंत्री आणि त्यांचा फौजफाटा फिरत आहे. कष्टकरी शेतकऱ्यांनी तुमच्या पगारासाठी आणि संरक्षणासाठी टॅक्स भरायचा आणि बदल्यात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडणार असेल, तर या दौऱ्याचा काय उपयोग?" असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. आता या दौऱ्यात केंद्रीय कृषी मंत्री या मागण्यांची दखल घेतात की शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा आश्वासनेच पडतात, याकडे संपूर्ण अमळनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments