जागतिक महिला दिनानिमित्त शेगाव येथे वृक्षारोपण; 'झाडे लावा, झाडे जगवा'चा दिला संदेश अमोल बावस्कार बुलडाणा (संपादक -:- हेमकांत गायकव...
जागतिक महिला दिनानिमित्त शेगाव येथे वृक्षारोपण; 'झाडे लावा, झाडे जगवा'चा दिला संदेश
अमोल बावस्कार बुलडाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शेगाव:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री गोरक्षण संस्थान, शेगाव येथे प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका सौ. सुषमाताई राजेंद्रभाऊ भिसे यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. "झाडे लावा, झाडे जगवा" हा मूलमंत्र देत पर्यावरण संवर्धनासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
पर्यावरण रक्षणाचा संकल्प
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी या कार्यक्रमात विविध प्रकारच्या सावली देणाऱ्या व फळझाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर लावलेली ही झाडे जगवण्याचा आणि त्यांचे पूर्णपणे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.
वृक्षारोपण ही काळाची गरज: सौ. सुषमाताई भिसे
याप्रसंगी मार्गदर्शन करताना नगरसेविका सौ. सुषमाताई भिसे म्हणाल्या की, "सध्याच्या काळात होत असलेले हवामानातील बदल आणि वाढते तापमान पाहता वृक्षारोपण करणे ही केवळ हौस नसून काळाची गरज आहे. महिला दिनानिमित्त निसर्गाचे रक्षण करणे ही खऱ्या अर्थाने वसुंधरेची सेवा आहे." त्यांनी प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी झाड लावून ते जगवावे, असे कळकळीचे आवाहनही केले.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या उपक्रमात प्रभाग क्रमांक ९ मधील महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षारोपणात सहभाग नोंदवला. महिला शक्तीने एकत्र येत पर्यावरण रक्षणाचा हा संदेश दिल्याने या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.निसर्गाप्रती असलेली ही सामाजिक जबाबदारी ओळखून आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे श्री गोरक्षण संस्थानचा परिसर आता अधिक हिरवागार होण्यास मदत होणार आहे. यावेळी सुषमा भिसे,अंजली जोशी, संजीवनी गोतमारे, संगीता आखरे, योगिता शेंडे, वनमाला सांगोळे, शोभा भोपळे, सुजाता आपटे, अलका खांजोड, सुवर्णा शेगोकार, योगिता बोरोकार, विलास चेते, विशाल सांगोळे, मिरगे सर, राजेंद्र भिसे, उपस्थित होते.


No comments