adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम; नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

 चोपड्यात पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम; नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:-  शहरातील...

 चोपड्यात पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम; नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:-  शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवरील वाढता आर्थिक ताण लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली असून, पाणीपट्टी थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ३१ मार्चपर्यंत थकबाकी न भरल्यास नळ जोडण्या तोडण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नगरपरिषदेच्या माहितीनुसार, शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी दरवर्षी सुमारे ५ कोटी रुपयांचा खर्च होत असताना, ३१ मार्चअखेर प्रत्यक्ष वसुली केवळ २.१ कोटी रुपयांपर्यंतच मर्यादित राहिली आहे. म्हणजेच ५० टक्क्यांहूनही कमी वसुली होत असल्याने प्रशासनावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. 

रामनिवास झवर मुख्याधिकारी
नगरपरिषद चोपडा 

सन २०२५-२६ च्या विवरणपत्रानुसार वीज बिल, रसायने, देखभाल-दुरुस्ती आणि कर्मचारी वेतनावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. मात्र, अनेक नागरिकांनी गेल्या ५ ते १० वर्षांपासून पाणीपट्टी भरलेली नसल्याने उत्पन्न आणि खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.

एप्रिल-मे महिन्यात धडक मोहीम

थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने एप्रिल आणि मे महिन्यात विशेष धडक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत मोठ्या थकबाकीदारांच्या नळ जोडण्या थेट खंडित करण्यात येणार आहेत.

तसेच, ज्यांनी विनापरवाना नळ जोडणी घेतली आहे अशा अनधिकृत नळधारकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असून, त्यांच्याकडून ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाणार आहे.

कमी वसुलीचा विकासकामांवर परिणाम

पाणीपट्टीची कमी वसुली ही केवळ पाणीपुरवठ्यापुरती मर्यादित नसून शहराच्या एकूण विकासकामांवरही त्याचा परिणाम होत आहे. नगरपरिषद संचालनालय (मुंबई) आणि जिल्हाधिकारी (जळगाव) यांच्याकडून वसुली वाढवण्याबाबत दबाव असून, उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास वित्त आयोगाचा निधी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे रस्ते, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांवर परिणाम होऊ शकतो. तसेच कामात कसूर करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवरही कारवाई प्रस्तावित आहे.

मुख्याधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

“शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लागणारा खर्च हा पाणीपट्टी वसुलीतूनच भागवला जातो. थकीत पाणीपट्टीमुळे शहराच्या प्रगतीत अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी आपली थकबाकी तात्काळ भरून प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असे आवाहन चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले आहे.

No comments