अहिल्यानगर हादरलं...! मुख्याधिकाऱ्यावर थेट गोळीबार..उपनगराध्यक्षांच्या पतीवर गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवा...
अहिल्यानगर हादरलं...! मुख्याधिकाऱ्यावर थेट गोळीबार..उपनगराध्यक्षांच्या पतीवर गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- जिल्ह्यात नेवासा शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली असून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपावरून संजय लक्ष्मण सुखदान (रा. नेवासा) याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपी संजय सुखदान हे नेवासा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षांचे पती असल्याने या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.
मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी प्रकरण नेवासा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांनी गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी करत आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती दिली.
ही थरारक घटना दि. १३ एप्रिल रोजी रात्री सुमारे पावणेआठच्या सुमारास घडली. मात्र, घाबरल्यामुळे मुख्याधिकारी फराटे यांनी तत्काळ तक्रार नोंदवली नव्हती. शनिवारी सायंकाळी त्यांनी अखेर तोफखाना पोलिसांकडे फिर्याद दिली.फिर्यादीत नमूद केल्यानुसार, संजय सुखदान याने यापूर्वीही नियमबाह्य कामासाठी दबाव टाकला होता. नकार दिल्यानंतर त्याने चप्पल उगारून मारहाणीचा प्रयत्न केला होता, तसेच “आमच्या म्हणण्यानुसार काम नाही केले तर परिणाम भोगावे लागतील” अशी धमकीही दिली होती.घटनेच्या दिवशी सायंकाळी नगरपंचायत कार्यालयात चर्चा सुरू असताना सुखदान तेथे येऊन शिवीगाळ करत “बाहेर ये, आज तुला बघतोच” अशी उघड धमकी दिली. त्यानंतर फराटे कार्यालयीन काम आटोपून अहिल्यानगरकडे निघाले असताना आरोपीने बुलेट मोटरसायकलने त्यांच्या चारचाकी वाहनाला धडक दिली.
यानंतर खोलेश्वर मंदिर चौकाजवळ आरोपीने वाहन आडवे लावून गावठी कट्ट्यातून थेट गोळीबार केला. फराटे खाली वाकल्यामुळे पहिली गोळी चुकली. दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न करताना कट्ट्याचा ट्रिगर अडकल्याने मोठा अनर्थ टळला.
तसेच, आरोपीचे काही साथीदार पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर फिर्याद दाखल करण्यात आल्याचे फराटे यांनी नमूद केले आहे.या गंभीर घटनेमुळे नेवासा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस आरोपीच्या शोधात असून पुढील तपास सुरू आहे.

No comments