महाआयटीचे ‘आपले सेवा सेतु’ पोर्टल बंद; जळगाव जिल्ह्यात नागरिकांची मोठी गैरसोय, तात्काळ सुरू करण्याची मागणी भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हे...
महाआयटीचे ‘आपले सेवा सेतु’ पोर्टल बंद; जळगाव जिल्ह्यात नागरिकांची मोठी गैरसोय, तात्काळ सुरू करण्याची मागणी
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत MahaIT या कंपनीमार्फत चालविले जाणारे आपले सेवा सेतु केंद्र (महा ई-सेवा पोर्टल) मागील दोन ते तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या पोर्टलद्वारे शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना विविध शासकीय दाखले व सेवा मिळत असतात. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने आवश्यक दाखले मिळत नसून शालेय तसेच इतर शासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे मिळत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत महाआयटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मागील दोन ते तीन दिवसांपासून सर्व्हर बंद असल्याची माहिती दिली आहे. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे सर्वसामान्य नागरिकांचे काम ठप्प झाले असून प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, अनेक नागरिक व विद्यार्थ्यांनी याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते Kedarnath Sanap यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर सानप यांनी जिल्हाधिकारी यांची समक्ष भेट घेऊन संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी तसेच पोर्टल तात्काळ सुरू करावे, अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे केली आहे. या घटनेमुळे ई-गव्हर्नन्स सेवांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments