वादळी पावसाचा तडाखा; आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा नुकसानग्रस्त भागांचा दौरा, तात्काळ पंचनाम्याचे आदेश चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेम...
वादळी पावसाचा तडाखा; आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा नुकसानग्रस्त भागांचा दौरा, तात्काळ पंचनाम्याचे आदेश
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
दि. ०३ एप्रिल २०२६ रोजी आमदार सोनवणे यांनी वर्डी, गरताड आणि कुरवेल या गावांना भेट देत ग्रामस्थांच्या उपस्थितीत मका, केळी तसेच इतर पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
कुरवेल येथील जिल्हा परिषद शाळेलाही भेट देऊन वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. शाळेच्या दुरुस्तीबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त गावांमध्ये त्वरित पंचनामे सुरू करून ते पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावेत, तसेच एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आमदार सोनवणे यांनी प्रशासनाला दिले.
तसेच एमसीइबी अधिकाऱ्यांकडून वीजपुरवठा खंडित झालेल्या भागांचा आढावा घेत शहरी व ग्रामीण (कृषीसह) भागातील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आदेशही देण्यात आले.
या पाहणी दौऱ्यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, गट विकास अधिकारी अंजली बर्गे, मुख्याधिकारी रामनिवास झवर, एमसीइबी अधिकारी बोरसे तसेच महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

No comments