वनोलीत अतिक्रमणाचा कहर; प्रशासन गप्प का? कारवाईअभावी ग्रामस्थ आक्रमक, राजकीय हस्तक्षेपाचा संशय यावल (प्रतिनिधी – वैभव कोळी) : (संपादक -:- ...
वनोलीत अतिक्रमणाचा कहर; प्रशासन गप्प का?कारवाईअभावी ग्रामस्थ आक्रमक, राजकीय हस्तक्षेपाचा संशय
यावल (प्रतिनिधी – वैभव कोळी) :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील वनोली गावात अतिक्रमण प्रकरण दिवसेंदिवस गंभीर बनत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. गावातील काही व्यक्तींनी विविध ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, सरपंच व ग्रामसेवक राजकीय दबावामुळे कारवाई टाळत असल्याची चर्चा गावात रंगली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, सतीश योगराज चौधरी व विजय योगराज चौधरी यांनी गावातील वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे. शासकीय घरकुल मंजूर असतानाही ते भाड्याने देऊन इतर जागांवर आर.सी.सी. बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधितांचे मूळ गाव म्हैसवाडी असून तेथेही त्यांच्या नावे जमीन असल्याचे सांगितले जाते. वनोलीत आल्यानंतर त्यांनी दोन ते तीन ठिकाणी अतिक्रमण केल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. जिओ-टॅग फोटोमध्ये या बांधकामांचे स्पष्ट पुरावे असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अतिक्रमणधारकांनी वकिलामार्फत ग्रामपंचायतीला नोटीस पाठवून कारवाई चुकीची असल्याचे नमूद केल्याने वाद आणखी तीव्र झाला आहे. या प्रकरणात ग्रामसेवक प्रवीण चौधरी कारवाई का करत नाहीत, तसेच सरपंचांवर राजकीय दबाव आहे का, असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव असल्यामुळेच कारवाई होत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत यांच्याकडे वारंवार तक्रारी करून पाठपुरावा केला असला तरी, नोटीस देण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. जिओ-ट्रॅकिंग फोटो व जमीन उतारे सादर करूनही प्रशासन निष्क्रिय असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये वाढत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आता इशारा दिला असून, “लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारू,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. परिस्थिती गंभीर होत असून, प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

No comments