कासार सिरसी येथे श्री करी बसवेश्वर महाराज यात्रेची सांगता; सोलापूरच्या बाळकृष्ण शेळके यांना ‘केशरी’ किताब. लातूर, जि.प्र. (उत्तम माने ) (स...
कासार सिरसी येथे श्री करी बसवेश्वर महाराज यात्रेची सांगता; सोलापूरच्या बाळकृष्ण शेळके यांना ‘केशरी’ किताब.
लातूर, जि.प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर जिल्ह्यातील कासार सिरसी : ग्रामदैवत श्री करी बसवेश्वर महाराजांच्या यात्रेची यंदा विविध धार्मिक कार्यक्रम, भव्य रथोत्सव, शोभेची दारू आणि जंगी कुस्त्यांच्या फडाने उत्साहात सांगता करण्यात आली. यात्रेनिमित्त शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावर्षीच्या कुस्ती स्पर्धेत सोलापूर येथील पैलवान बाळकृष्ण शेळके यांनी प्रथम क्रमांक पटकावत ‘श्री करी बसवेश्वर केशरी’ हा मानाचा किताब मिळवला. त्यांना २१ हजार रुपये रोख पारितोषिक आणि चांदीची गदा प्रदान करण्यात आली. द्वितीय क्रमांकासाठी भुसनी (ता. उमरगा) येथील दीपक सगरे आणि सोलापूरचे राम शेळके यांच्यात झालेली कुस्ती बरोबरीत सुटली. तृतीय क्रमांक मंजुनाथ शंकर माने यांनी मिळवला. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मठाधिपती गुरुमुर्गेंद्र स्वामी यांच्या अधिपत्याखाली तसेच सांगली येथील श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामी विरक्त मठ यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रा पार पडली.
यात्रेनिमित्त नित्य महापूजा, ग्रंथ पारायण, रक्तदान शिबिर, जनावरांचा बाजार तसेच श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रथोत्सव, अग्निप्रवेश आणि शोभेची दारू यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. कुस्ती फडामध्ये कैलासवासी बसवणप्पा सिद्धप्पा होळकुंदे यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक देण्यात आले. तसेच कैलासवासी भाऊराव वेल्हाळ यांच्या स्मरणार्थ ११ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक व्यापारी प्रमोद वेल्हाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रवीण होळकुंदे, उपाध्यक्ष गिरीश चिंचनसुरे, कोषाध्यक्ष सचिन दादा कडतने, सचिव किरणजी शीलवंत तसेच चंद्रकांत हत्ते, शिवा स्वामी, दिलीप डिग्गे, नागू शबादे, प्रकाश नागराळे, राजीव डांगे व मोनेश्वर पांचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments