ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक डॉ. आर. एस. दर्यापूरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेम...
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक डॉ. आर. एस. दर्यापूरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली : येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात संस्थापक डॉ. आर. एस. दर्यापूरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. ए. भोई सर, नामदेव भोई, अनिल न्हावकर, शांताराम महाजन यांच्यासह वाचक व मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष एस. ए. भोई यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. दर्यापूरकर यांनी अंतुर्ली परिसरात वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत कमी खर्चात रुग्णांचे प्राण वाचवून समाजसेवेचे मोठे कार्य केले. ते या भागात प्रख्यात डॉक्टर म्हणून ओळखले जात होते आणि आजही नागरिक त्यांच्या कार्याची आठवण काढतात. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने ज्ञानोदय मंडळाची स्थापना करून ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय उभारले. तसेच कर्की येथे आर. जी. डी. विद्यालय, इच्छापूर-निमखेडी येथे ज्ञानपूर्णा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.
या शैक्षणिक उपक्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन शिक्षक, पोलीस, कृषी, वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले असून त्यामुळे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला आहे. अंतुर्ली येथील वाचनालय आजही सुमारे 32 हजार ग्रंथांसह सुस्थितीत सुरू असून, वाचन संस्कृती रुजविण्यात डॉ. दर्यापूरकर यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी स्वतः त्या काळात वाचनालयातील बहुतेक सर्व पुस्तके वाचून ज्ञानप्रेमाचा आदर्श निर्माण केला. यावेळी संस्थेच्या वतीने तसेच उपस्थित नागरिकांनी या महान व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

No comments