adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर शहरात युवकांचा आदर्श उपक्रम! उन्हाच्या तडाख्यात ‘जल हि जीवन है’चा संदेश देत थंडगार दिलासा

 रावेर शहरात युवकांचा आदर्श उपक्रम! उन्हाच्या तडाख्यात ‘जल हि जीवन है’चा संदेश देत थंडगार दिलासा  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- ह...

 रावेर शहरात युवकांचा आदर्श उपक्रम! उन्हाच्या तडाख्यात ‘जल हि जीवन है’चा संदेश देत थंडगार दिलासा 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले असताना, रावेर शहरातील शौकत मैदान परिसरातील युवकांनी एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. “जल हि जीवन है” या महत्त्वपूर्ण संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत इमाम वाडा येथील रहिवासी जुबेर खान आणि त्यांच्या मित्रमंडळींनी स्वतःच्या खर्चाने पाणपोई सुरू केली आहे.

ज्या ठिकाणी ही पाणपोई उभारण्यात आली आहे, त्या मार्गावरून दररोज शाळा, महाविद्यालये, दवाखाने आणि बाजारपेठेकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची ये-जा अधिक वाढली आहे. अशा कडक उन्हात तहानलेल्या प्रवाशांसाठी ही पाणपोई खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे. विशेष म्हणजे, या भागात पिण्याच्या पाण्याची सोय नसतानाही यापूर्वी कोणी पुढाकार घेतला नव्हता. मात्र, युवकांनी सामाजिक जाणीव ठेवत ही उणीव भरून काढली. त्यांच्या या कृतीतून  “जल हि जीवन है” हा संदेश केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे. या उपक्रमातून युवकांनी समाजासमोर एक सकारात्मक विचार ठेवला आहे—

_“थोडं केलं तरी मोठा बदल घडू शकतो!”_

आजच्या काळात युवकांवर अनेकदा टीका केली जाते; मात्र अशा उपक्रमांमुळे त्यांची सामाजिक बांधिलकी, जबाबदारी आणि संवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येते. हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, समाजकार्यातून बदल घडवण्याची नवी दिशा देत आहे. स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे मनापासून कौतुक होत असून, युवकांच्या कार्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या उपक्रमात जुबेर खान यांच्यासह शेख आमीन, शेख आबीद, शेख अलीमोद्दीन आणि शाहरुख खान यांनी मोलाचे सहकार्य केले.

जुबेर खान यांची प्रतिक्रिया

“काही दिवसांपूर्वी या ठिकाणी पाण्याची गरज असल्याचे लक्षात आले होते. कामाच्या व्यस्ततेमुळे थोडा उशीर झाला; मात्र वेळ मिळताच मित्रांसोबत चर्चा करून आम्ही हा उपक्रम राबवला. जल हि जीवन है या भावनेतून समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण झाल्याचा आनंद आहे.”

No comments