सीडी पटणी गॅस एजन्सीकडून मोबदला न मिळाल्याचा आरोप; तुषार सोनवणे यांचा आंदोलनाचा इशारा ===================== नाशिक | येवला प्रतिनिधी (संपाद...
सीडी पटणी गॅस एजन्सीकडून मोबदला न मिळाल्याचा आरोप; तुषार सोनवणे यांचा आंदोलनाचा इशारा
=====================
नाशिक | येवला प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
======================
येवला : येवला तालुक्यातील साताळी गावचे तुषार पंढरीनाथ सोनवणे यांनी गॅस एजन्सीकडून कामाचा मोबदला न मिळाल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनवणे यांनी २०२० ते २०२४ या कालावधीत येवला शहरातील सीडी पटणी गॅस एजन्सीमार्फत गॅस सिलिंडर वितरणाचे काम केले. मात्र, या कामाचा मोबदला मिळावा म्हणून वारंवार पाठपुरावा करूनही एजन्सीकडून प्रतिसाद मिळाला नाही, असा त्यांचा आरोप आहे. यासोबतच मोबदला मागितल्यावर अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. “तू कुठेही जा, आमचे काहीही होणार नाही,” असे सांगत आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी त्यांनी नाशिक येथील कामगार आयुक्त कार्यालयाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी नाशिक येथील कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि तुषार सोनवणे यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.


No comments