माहेजी येथे शॉर्ट सर्किटमुळे आठ एकरांवरील मका जळून खाक; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान वाऱ्याच्या वेगामुळे आगीने रौद्ररूप धारण केले; ग्राम...
माहेजी येथे शॉर्ट सर्किटमुळे आठ एकरांवरील मका जळून खाक; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
वाऱ्याच्या वेगामुळे आगीने रौद्ररूप धारण केले; ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात 
माहेजी (ता. पाचोरा) येथील वरसाडे रस्त्यावरील आग लागलेल्या शेतातील मका पिकासोबत हतबल झालेला शेतकरी प्रभाकर पवार.
पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पाचोरा तालुक्यातील माहेजी-वरसाडे रस्त्यावरील शेतशिवारात आज दुपारी भीषण आग लागून सुमारे आठ एकर (अडीच हेक्टर) क्षेत्रावरील कापणी केलेला मका आणि चारा जळून खाक झाला. विजेच्या मुख्य वाहिनीवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले असून, यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नेमकी घटना काय माहेजी येथील शकील शेख प्यारु (गट नं. ५२), आमिना शेख प्यारु (गट नं. २४, २२८), युनूस शेख प्यारु (गट नं. ५२), सईदा शेख प्यारु (गट नं. ५१) आणि गंगुबाई सुरेश गोसावी (गट नं. २५) या सहा शेतकऱ्यांची एकूण अडीच हेक्टर जमीन प्रभाकर परशुराम पवार यांनी दीड लाख रुपये रोख बटाईने कसण्यासाठी घेतली होती. या जमिनीवर मका पिकाची कापणी झाली होती.आज दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास शेताच्या बांधावरून जाणाऱ्या मुख्य विद्युत वाहिनीवर अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि त्यातून उडालेल्या ठिणग्या मक्याच्या पिकावर पडल्या. हवेचा जोर प्रचंड असल्याने काही क्षणातच आगीने संपूर्ण आठ एकर क्षेत्र कवेत घेतले. यात मका पिकासह जनावरांचा चाराही पूर्णपणे जळून खाक झाला.पंचनामा आणि मदत कार्य:घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य गौतम साळवे, शिवाजी कोल्हे, हर्षद पटेल, बापू धनराज पाटील, राजू गायकवाड, अण्णा कोल्हे, पवन गायकवाड, विजू कोल्हे,सारंग पवार,हरीश सोनार व अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.घटने नंतर ग्राममहसुल अधिकारी जिज्ञासा पाटील, कृषी सहाय्यक प्रतीक्षा पवार आणि पोलीस पाटील राजेंद्र पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. हाता तोंडाशी आलेला घास निसटल्याने शेतकरी प्रभाकर पवार यांच्यावर मोठे संकट ओढवले असून, प्रशासनाने त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
No comments