चोपड्यात विश्व कल्याणासाठी 'णमो अरिहंताणं' नवकार महामंत्राचा जप चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा - ज्यांनी पूर्ण ...
चोपड्यात विश्व कल्याणासाठी 'णमो अरिहंताणं' नवकार महामंत्राचा जप
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा - ज्यांनी पूर्ण ज्ञान प्राप्त केले आहे आणि जे तीर्थ स्थापन करतात, ज्यांना मोक्ष प्राप्त झाला आहे, जे धर्म कार्याबद्दल मार्गदर्शन करतात व जे आध्यात्मिक ज्ञानाचे शिक्षण देतात,अशा सर्व आचार्यांना आदरपूर्वक नमस्कार करत विश्वशांतीची प्रार्थना करणारा नवकार मंत्र कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा देवतेला समर्पित नसून तो त्या सद्गुणांना समर्पित आहे. या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि आध्यात्मिक विकासाला चालना मिळते. संपूर्ण मंत्राचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो, ही पवित्र भावना मनात ठेवत विविध जाती धर्मातील स्त्री पुरुषांनी एकत्र येत प्रार्थना केली. जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना, मनुष्य विविध विवंचनांनी अशांत असताना केलेली प्रार्थना एका चांगल्या समाजासाठी असल्याचा भाव यावेळी प्रत्येकाच्या मनात होता.
विश्व शांती नवकार महामंत्र दिनानिमित्त दि. ९ एप्रिल, गुरुवार रोजी एकाच वेळी सकाळी ८ वाजता जगभरातील १०८ देशांमध्ये तर भारतात ६००० ठिकाणी 'सामुदायिक नवकार महामंत्र प्रार्थना' आयोजित करण्यात आली होती. चोपडा येथील मेनरोड वरील डॉ. निर्मल टाटीया यांच्या वास्तूत आयोजन करण्यात आलेल्या नवकार महामंत्र प्रार्थनेच्या आरंभी तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, माजी आमदार कैलास पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासाहेब घोलप, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन ॲड. घनश्याम पाटील, डॉ. निर्मल टाटीया तसेच सकल जैन समाज्याचे पदाधिकारी रमेश माणकलाल जैन, विनोदकुमार बिलाकचंद टाटीया, मोहनलाल गिरधारीलाल जैन, राजेंद्र रमणलाल जैन, सुभाषचंद किसनलाल बरडीया, अनिलकुमार सुनीलकुमार बुरड, संजय गोकुळदास श्रावगी, तिलकभाई शाह यांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी मोठ्या संख्येने एकत्र येत विश्व शांतीसाठी नवकार महामंत्राचे सामुदायिक पठण केले.
यावेळी सकल जैन समाजातर्फे विश्वशांती केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चंद्रहास गुजराथी तसेच ॲड. घनश्याम पाटील यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक राखेचा, चेतनकुमार दर्डा, सौ. अंकिता दर्डा यांनी केले.
आयोजनासाठी चोपडा येथील विश्वशांती नवकार दिवस महोत्सव समितीचे चेतन निर्मल टाटीया, दर्शन कन्हैयालाल देशलहरा, विशाल विलास जैन, मयुर संजय जैन, सौरभ सुशिलकुमार जैन, राजस राजेंद्र जैन, पवन अशोक जैन यांनी परिश्रम घेतले.

No comments