मलकापूर एसटी आगारात 'ड्युटी'चा बाजार; शिवसेनेचा आगार व्यवस्थापकांना तीव्र घेराव! अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायक...
मलकापूर एसटी आगारात 'ड्युटी'चा बाजार; शिवसेनेचा आगार व्यवस्थापकांना तीव्र घेराव!
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर: स्थानिक एसटी आगारात ड्युटी वाटपाच्या नावाखाली मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि वशिलेबाजी सुरू असल्याचा खळबळजनक आरोप करत शिवसेनेच्या वतीने आगार व्यवस्थापकांना धारेवर धरण्यात आले. ड्युटी लावण्यासाठी काही कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जातो, या मुद्द्यावरून शिवसैनिकांनी प्रशासनाला घेराव घालून जाब विचारला. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ड्युटी एलोकेशन विभागातील भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचला. प्रामुख्याने खालील मुद्दे उपस्थित करण्यात आले:
आर्थिक देवाणघेवाण: ड्युटी एलोकेशन करणारे कर्मचारी ठराविक चालक आणि वाहकांकडून आर्थिक लाभ (पैसे) घेऊन त्यांना सोयीच्या फेऱ्या आणि मार्ग देतात. जे कर्मचारी पैसे देत नाहीत, त्यांना मुद्दाम त्रासदायक ड्युटी दिली जाते.
चार्टला जाणीवपूर्वक विलंब: नियमानुसार ड्युटी एलोकेशन चार्ट दररोज दुपारी १२:०० वाजता लागणे बंधनकारक आहे. मात्र, आर्थिक तडजोडी करण्यासाठी हा चार्ट रात्री ७:०० वाजेपर्यंत लांबवला जातो.
संपर्क टाळणे: रात्री ७:०० नंतर ड्युटी लावणारे कर्मचारी आपले मोबाईल फोन बंद करून ठेवतात. यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला घरगुती अडचण किंवा आपत्कालीन प्रसंग आल्यास 'आपसी ऍडजेस्टमेंट' करणे अशक्य होते.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी केले. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे मोठे बळ आंदोलनाला लाभले होते. या घेराव आंदोलनात बुलढाणा विभागीय अध्यक्ष भरतजी हाडे, विभागीय सचिव संजय उबरहंडे, विभागीय संघटक उमेश पवार, मलकापूर डेपो अध्यक्ष सुशील झनके आणि डेपो सचिव गजानन लवंगे यांनी प्रशासकीय अन्यायावर जोरदार प्रहार केला. याप्रसंगी संदीप जायभाये, उमेश खताळ, प्रतिभाताई कोळी, राजेंद्र काजळे, गणेश सुशीर, अर्जुन कुयटे, वैभव पाटील, आणि तुषार पानट यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि एसटी कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासनाचा इशारा
आगार व्यवस्थापकांनी या तक्रारींची गंभीर दखल घेत, ड्युटी चार्ट वेळेवर लावण्याचे आणि पारदर्शकता पाळण्याचे तसेच 'टी-९' रोटेशन पद्धतीने ड्युटी लावण्याचे आगार व्यवस्थापक मुकुंद न्याव्हकर यांनी आश्वासन दिले. मात्र, "जर सात दिवसांच्या आत या भ्रष्ट कारभारात सुधारणा झाली नाही आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर शिवसेना स्टाईलने अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा दिपक चांभारे पाटील आणि भरतजी हाडे यांनी यावेळी दिला. या आंदोलनामुळे मलकापूर आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाविरोधात एकच चर्चा रंगली असून प्रशासनाच्या पुढील पावलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments