खामगावात दिव्यांग बांधवांसाठी भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न; शेकडो युवक-युवतींना नोकरीची संधी पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत...
खामगावात दिव्यांग बांधवांसाठी भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न; शेकडो युवक-युवतींना नोकरीची संधी
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग युवक-युवतींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘भव्य रोजगार मेळावा’ आज खामगाव येथे उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. डॉ. रेड्डीज फाउंडेशनच्या GROW उपक्रम आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटी, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कर्णबधिर, मूकबधिर तसेच अस्थिव्यंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी विशेषतः आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. ‘कौशल्य विकास आणि रोजगार मार्गदर्शन’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम निवासी मूक-बधिर विद्यालयात पार पडला. मेळाव्यात उत्पादन, पॅकेजिंग, वेअरहाऊस, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, BPO व डेटा एन्ट्री अशा विविध क्षेत्रांतील नामांकित 8 ते 10 कंपन्यांनी सहभाग घेतला. उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन त्यांची निवड करण्यात आली. अनेक उमेदवारांना जागेवरच नोकरीची संधी मिळाली.
निवड झालेल्या उमेदवारांना GROW उपक्रमांतर्गत 45 दिवसांचे मोफत निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये इंग्रजी, संगणक, जीवन कौशल्ये तसेच जॉब-रोल संबंधित मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षण काळात राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9,500 ते 15,000 रुपये वेतनासह PF आणि ESIC अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मेळाव्यात जिल्हा कौशल्य विकास अधिकाऱ्यांनी तसेच विविध उद्योजकांनी दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजना, मुद्रा कर्ज योजना व स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.
मूक-बधिर उमेदवारांसाठी सांकेतिक भाषेतील दुभाष्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच व्हीलचेअर वापरणाऱ्या उमेदवारांसाठी रॅम्प व स्वयंसेवकांची मदत उपलब्ध करून देण्यात आली होती. डॉ. रेड्डीज फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “ग्रामीण भागातील दिव्यांग युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य संधी मिळाल्यास ते नक्कीच यशस्वी होऊ शकतात. या मेळाव्याद्वारे अनेकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.” तर श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सचिवांनी सांगितले की, “हा मेळावा आमच्या विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी ठरला असून त्यांच्या भविष्याला नवी दिशा मिळेल.” या रोजगार मेळाव्यास दिव्यांग बांधव व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूणच, हा उपक्रम बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग युवकांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक ठरला आहे.

No comments