adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोल्हापूरच्या कन्येची भरारी; अस्मिता लांडगेची कर सहाय्यक व मंत्रालय लिपिक पदावर दुहेरी निवड

 कोल्हापूरच्या कन्येची भरारी; अस्मिता लांडगेची कर सहाय्यक व मंत्रालय लिपिक पदावर दुहेरी निवड  (कोल्हापूर जिल्हा | प्रतिनिधी) (संपादक – हेमका...

 कोल्हापूरच्या कन्येची भरारी; अस्मिता लांडगेची कर सहाय्यक व मंत्रालय लिपिक पदावर दुहेरी निवड 


(कोल्हापूर जिल्हा | प्रतिनिधी)

(संपादक – हेमकांत गायकवाड)

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वडणगे येथील धनगर गल्लीतील सर्वसामान्य कुटुंबातील अस्मिता लांडगे हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC परीक्षेच्या निकालात तिची कर सहाय्यक (Tax Assistant) तसेच महसूल मंत्रालय लिपिक (Ministry Assistant) या दोन्ही पदांसाठी निवड झाली असून, तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अस्मिता लांडगे हिचे वडील भगवान लांडगे हे सेंट्रिगचे काम करतात, तर आई छाया लांडगे या शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या अस्मिताला लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय नोकरी मिळवण्याचे स्वप्न होते. घरची आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही तिने शिक्षण आणि अभ्यासाची कास सोडली नाही.

गावातील देवी पार्वती हायस्कूलमधून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने कोल्हापूर गाठले. शिक्षणासोबतच तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला. मार्गदर्शनासाठी क्लास जॉइन करताना आर्थिक अडचणी होत्या, मात्र कमी फीच्या ऑनलाइन क्लासेसच्या मदतीने तिने अभ्यास सुरूच ठेवला.

दरम्यान, कोल्हापूर न्यायालयातील क्लार्क पदासाठी तिने परीक्षा व मुलाखत दिली होती; मात्र त्या वेळी यश हुकले. या अपयशामुळे क्षणिक निराशा आली, पण हार न मानता तिने पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. अखेर तिच्या परिश्रमांना यश मिळाले आणि MPSC परीक्षेत ती दुहेरी पदांसाठी पात्र ठरली.

अस्मिताच्या यशामागे तिची शिस्त आणि त्याग महत्त्वाचा ठरला. सण-उत्सव, सुट्ट्या यांचा मोह टाळत ती दररोज सकाळी ठरलेल्या वेळेत अभ्यासासाठी कोल्हापूरला जात असे. वडणगे ते गंगावेश हा प्रवास रिक्षाने करताना ती केवळ ४० रुपयेच खर्च करत असे. वडील ५० रुपये देत असले तरी परिस्थितीची जाणीव ठेवून ती अतिरिक्त पैसे घेणे टाळत असे. गंगावेश येथून गांधी मैदान वाचनालयापर्यंत ती पायी जाऊन अभ्यास करत होती.

तिच्या या यशामुळे आई-वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान झळकत आहे. “अस्मिताने खूप कष्ट घेतले. सणवार बाजूला ठेवून ती अभ्यास करत राहिली, त्याचेच हे फळ आहे,” असे भावूक शब्दांत वडील भगवान लांडगे यांनी सांगितले.

अस्मिता म्हणाली, “मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. अपयश आले तरी हार मानली नाही. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याचा मला खूप आनंद आहे.”

अस्मिताचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण गाव, समाज आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या यशाबद्दल करवीर तालुका व परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments