यावलमध्ये ‘स्वराज्य चषक’ नाईट क्रिकेट स्पर्धा; २९-३० एप्रिलला भव्य आयोजन, युट्युब लाईव्हचे आकर्षण भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
यावलमध्ये ‘स्वराज्य चषक’ नाईट क्रिकेट स्पर्धा; २९-३० एप्रिलला भव्य आयोजन, युट्युब लाईव्हचे आकर्षण
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : शहराच्या क्रीडा इतिहासात प्रथमच दोन दिवसीय भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून २९ व ३० एप्रिल रोजी मेश ॲग्रो प्रायोजित “स्वराज्य चषक” स्पर्धा रंगणार आहे. बसस्थानकाजवळील एसटी महामंडळाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे मैदानावर मोठी स्क्रीन व युट्युब लाईव्ह प्रसारण, ज्यामुळे प्रत्येक सामना थेट पाहता येणार आहे.
या स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होत असून त्यापैकी चार संघ आमंत्रित आहेत. विशेष म्हणजे सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, पोलीस विभाग, महसूल विभाग व पत्रकार संघ अशा विविध क्षेत्रांतील संघ एकाच मैदानात उतरून खेळणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा न राहता सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ठरणार आहे.
२९ एप्रिल रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल जावळे राहणार असून उद्घाटन फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष छायाताई पाटील, धनंजय चौधरी, डीवायएसपी अनिल बडगुजर, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नगरसेवक अतुल पाटील, नंदाताई महाजन, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, डॉ. कुंदन फेगडे तसेच युनूस मन्सुरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा ३० एप्रिल रोजी रात्री १० वाजता होणार आहे.
या स्पर्धेमुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामाच्या ताणतणावातून विरंगुळा मिळेल, तसेच जनतेशी अधिक संवाद साधण्याची संधी मिळेल, असे प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी सांगितले. तर डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी या स्पर्धेमुळे पोलीस, पत्रकार व सर्वसामान्य नागरिक यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील व परस्पर समन्वय वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमुळे निर्माण झालेला दुरावा विसरून सर्वपक्षीय पदाधिकारी या स्पर्धेत एकत्र खेळताना दिसतील, त्यामुळे समाजात एकतेचा संदेश जाईल.
या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन शेखर पटेल, सुनील गावडे, कैलास भोईटे, रोहित सुतार, अक्षय भोईटे, रामभाऊ यादव, वेदांत सराफ यांच्यासह स्वराज्य चषकातील सर्व सहभागी संघांच्या वतीने करण्यात आले आहे.
👉 एकंदरीत, क्रीडा, मनोरंजन आणि सामाजिक सलोखा यांचा संगम घडवणारी ही स्पर्धा यावलकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

No comments