मुक्ताईनगरमध्ये शाळकरी मुलींना शिलाई मशिनांचे वितरण; महिला सशक्तीकरणाला चालना प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मु...
मुक्ताईनगरमध्ये शाळकरी मुलींना शिलाई मशिनांचे वितरण; महिला सशक्तीकरणाला चालना
प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज शाळकरी मुलींना शिलाई मशिन व साहित्याचे वितरण केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा शाळेच्या संस्थेच्या सचिव श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम समता फाउंडेशन, मुंबई व शाळेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.
समता फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी शिलाई मशिनचे विविध कोर्सेस नियमितपणे घेतले जातात. यासोबतच परिसरातील होतकरू बेरोजगार तरुणी व महिलांसाठीही प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. कोर्स पूर्ण करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनी, तरुणी तसेच कष्टकरी महिलांना स्वयंरोजगाराकडे वळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून शिलाई मशिनांचे वितरण केले जाते.
गेल्या तीन वर्षांपासून समता फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेत नियमित तसेच उन्हाळी सुट्टीत विनामूल्य इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि शिलाई मशिन संदर्भातील विविध कोर्सेस आयोजित केले जात आहेत. या उपक्रमांचा लाभ शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह परिसरातील अनेक तरुण-तरुणींना व महिलांना होत असून, अनेकांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा मार्ग निवडला आहे.
या अनोख्या उपक्रमामुळे आतापर्यंत अनेक शिलाई मशिनांचे वितरण करण्यात आले असून, महिला सशक्तीकरणाला मोठी चालना मिळाली आहे. शाळा केवळ शैक्षणिक कार्यापुरती मर्यादित न राहता समाजातील महिला व तरुणांना रोजगाराभिमुख कौशल्ये देत त्यांच्या उज्ज्वल भविष्याला हातभार लावत आहे.
या उपक्रमाचे श्रेय शाळेच्या संस्थेच्या सचिव श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या दूरदृष्टीला दिले जात असून, मुख्याध्यापक व्ही. के. वडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहेत. परिसरातील नागरिकांकडून शाळा व समता फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.


No comments