खाकी डागाळली! गुन्ह्यात मदतीसाठी तब्बल १ लाखांची लाच मागणारा नगर तालुक्याचा पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात..!तडजोडीअंती २ लाख...
खाकी डागाळली! गुन्ह्यात मदतीसाठी तब्बल १ लाखांची लाच मागणारा नगर तालुक्याचा पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात..!तडजोडीअंती २ लाखांवरून १ लाखावर आला होता पोलीस उपनिरीक्षक
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात आरोपी असलेल्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी आणि कायदेशीर कारवाईची तीव्रता कमी करण्यासाठी तडजोडीअंती तब्बल एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ने धडक कारवाई केली आहे.जयेश मोतीलाल गांगुर्डे असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे (PSI) नाव आहे. याप्रकरणी अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मामासह इतर १५ नातेवाईकां विरोधात ११ मे २०२६ रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांच्याकडे होता.या तपासामध्ये मदत करण्यासाठी आणि गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी गांगुर्डे यांनी सुरुवातीला तक्रारदाराकडे तब्बल दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १८ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली.तक्रार प्राप्त झाल्यानंतर 'एसीबी'च्या पथकाने तात्काळ लाचेच्या मागणीची पडताळणी सुरू केली.या पडताळणी दरम्यान पोलीस मुख्यालय,अहिल्यानगर येथे तक्रारदार आणि पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांची भेट झाली.या भेटीदरम्यान गांगुर्डे यांनी तडजोड करत दोन लाख रुपयांऐवजी एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली.गांगुर्डे यांनी लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अत्यंत गोपनीयतेने सापळा रचला.मात्र, प्रत्यक्ष रक्कम स्वीकारण्यापूर्वीच एसीबीच्या पथकाने कारवाईची चक्र फिरवून संशयित पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांना ताब्यात घेतले.त्यामुळे प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली गेली नसली,तरी लाचेची मागणी सिद्ध झाल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चोखपणे पार पाडण्यात आली.सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक राजू आल्हाट
कारवाईत सहभागी कर्मचारी:
पोना / ७०९ चंद्रकांत भिमसेन काळे,पोकॉ / २५७९ किशोर विठ्ठल कुळधर,पोकॉ / २२६२ शेखर बाळासाहेब वाघ,पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे करीत असून
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे आणि पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपूटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन 'एसीबी'कडून करण्यात आले आहे.

No comments