तीन महिन्यांपासून बंद असलेला आरओ प्लॅन कधी सुरू होणार? प्रहार संघटनेचा लोणवडी ग्रामपंचायतीला जाब; लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्याचे ग्राम सचिव...
तीन महिन्यांपासून बंद असलेला आरओ प्लॅन कधी सुरू होणार?
प्रहार संघटनेचा लोणवडी ग्रामपंचायतीला जाब; लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्याचे ग्राम सचिवांचे आश्वासन
पल्लवी पाटील | बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मलकापूर तालुक्यातील लोणवडी ग्रामपंचायतीमध्ये मागील वर्षी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून आरओ प्लॅन सुरू करण्यात आला होता. मात्र नवीन बसविण्यात आलेला हा आरओ प्लॅन आतापर्यंत तीन वेळा बंद पडला असून, त्यापैकी दोन वेळा ग्रामपंचायतीने तांत्रिक बिघाड दूर करून तो पुन्हा सुरू केला होता.
सध्या भर उन्हाळ्यात गेल्या तीन महिन्यांपासून आरओ प्लॅन बंद असल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे.
ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नासाठी प्रहार संघटना सातत्याने पाठपुरावा करत असून, यापूर्वीही संघटनेने आंदोलनाचा इशारा देत गुढी उभारणे तसेच महापूजा आंदोलनासारखे उपक्रम राबवले होते. त्यानंतर दोन वेळा आरओ प्लॅन सुरू करण्यात आला होता.
दरम्यान, प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सचिव नाफडे मॅडम यांची भेट घेऊन आरओ प्लॅन तातडीने सुरू करण्याची मागणी केली. यावेळी “लवकरच आरओ प्लॅन सुरू करण्यात येईल,” असे आश्वासन ग्राम सचिवांनी दिले.
ग्रामपंचायतीने दिलेले आश्वासन कितपत पूर्ण होते, की पुन्हा प्रहार संघटना आक्रमक भूमिका घेते, याकडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
“गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी प्रहार संघटना नेहमी कटिबद्ध असते. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही. पुढील आठवड्यातही आरओ प्लॅन सुरू न झाल्यास लोणवडी ग्रामपंचायतसमोर ‘धोंडी धोंडी पाणी दे’ आंदोलन छेडण्यात येईल.”
अमोल बावस्कार
प्रहार संघटनेचे युवा तालुका प्रमुख

No comments